गंगाखेड : गंगाखेड न.प.चे नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटले आहे. नगराध्यक्षपदाची निवड जूनच्या तिसर्या आठवड्यात होणार असून यासाठी नवीन घडामोडीला गंगाखेड शहरात वेग आला आहे. गंगाखेडचे नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्यासह दोन नगरसेवकांवर गंगाखेड पोलिस ठाण्यात अपहरण व अॅट्रॉसिटीची गुन्हा ३० मे रोजी दाखल झाला आहे. येथील नगराध्यक्षपदाचा कालावधी खुल्या प्रवर्गासाठी अडीच वर्षांचा होता. तो १५ जून रोजी संपणार आहे. यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ओबीसी महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपदी राखीव आहे. याच पार्श्वभूमीवर गंगाखेडच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. येथील विलासराव माणिकराव जंगले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २८ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपी नगराध्यक्ष रामप्रभू ग्यानदेव मुंडे, मनोहर महाराज केंद्रे, प्रवीण ऊर्फ बाळू काबरा हे पेट्रोल पंपावर येऊन म्हणाले, तुझी बायको कुठे आहे, नगरपालिकेच्या संदर्भात बोलायचे आहे. विलासराव जगंले यांची पत्नी पद्ममीनबाई ह्या राकॉंच्या नगरसेविका आहेत. पद्ममीनबाई यांना जातीवाचक शिवीगाळ करुन डोक्याला बंदूक लावून (गाडी क्रमांक एम.एच.२२-९०९) गाडीत ढकलले. या गाडीमध्ये नेऊन अनोळखी ठिकाणी डांबून ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात विलासराव जंगले यांच्या फिर्यादीवरुन गंगाखेडचे नगराध्यक्ष रामप्रभू ग्यानदेव मुंडे, नगरसेवक मनोहर महाराज केंद्रे, प्रवीण ऊर्फ बाळू काबरा यांच्याविरुद्ध अपहरण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)राकाँच्या नगरसेविका पद्मीनबाई विलासराव जंगले यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करुन बळजबरीने पळवून नेले. तसेच त्यांच्या मुलास काठीने व गजाने मारहाण करण्यात आली. प्रवीण ऊर्फ बाळू काबरा नगरसेविका पद्मीनबाई यांना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
नगराध्यक्षावर अपहरणाचा गुन्हा
By admin | Published: June 01, 2014 12:13 AM