छत्रपती संभाजीनगर : अकरावीतील मुलगी रेखा (नाव बदललेले) व मुलाच्या वादातून १७ वर्षांच्या दोन मुलांचे काही जणांनी अपहरण केले. नारळीबागेतील एका फ्लॅटवर नेत जवळपास १५ ते १६ गुंडांनी त्यांना निर्वस्त्र करून मारहाण केली. उठाबशा मारायला लावून अताेनात छळ केला. या सर्व घटनेचे मोबाइलमध्ये चित्रण करून आम्हीच रेखाला लाथ मारली, धक्का देऊन ढकलले, असे बळजबरीने म्हणायला लावले. नंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात सोडून छोटू झिरपे हा इसम पसार झाला. मंगळवारी सायंकाळी ६:३० ते रात्री ९ च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली.
अकरावीत शिकणारा १७ वर्षीय सचिन (नाव बदललेले) चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एका ट्यूशनमध्ये जातो. मंगळवारी ट्यूशन संपल्यानंतर तो मित्रासोबत घरी जात होता. मॉस्को कॉर्नर चौकात दोन दुचाकीस्वारांनी सचिनची दुचाकी थांबवली. आणखी तीन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी त्यांना मारहाण सुरू केली. बळजबरीने दुचाकीवर नागेश्वरवाडीत फ्लॅटवर नेले. तेथे अन्य ८ गुंड उपस्थित होते. तू रेखाला धक्का का दिला, असा प्रश्न करत सर्वांनी मारहाण केली. सचिन त्यांना खरा प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत होता. तरीही त्यांनी टोकदार धातूचे पाते असलेल्या काठीने हातापायांवर वार केले. घड्याळ, मोबाइल काढून घेतले. अंगावरील कपडे काढून मारत राहिले.
सचिन, रोहितला मारहाणीमुळे प्रचंड वेदना होत होत्या. तरीही गुंडांना दया आली नाही. उठाबशा काढायला लावून मोबाइलमध्ये चित्रण केले. त्यानंतर तेथे छोटू झिरपे गेला. पोलिसांकडे तक्रार केली तर जिवे मारून टाकू, असे त्याने धमकावले. मोबाइल काढून बळजबरीने खोटे बोलायला सांगितले. सचिनने नकार देताच पुन्हा मारहाण केली. रेखाला मी पायऱ्यांवरून ढकलले, गाडीवरून लाथ मारली, असे बळजबरीने वदवून घेतले. साधारण ८:३० वाजता अपार्टमेंटच्या खाली आणत घड्याळ ठेवून घेत मोबाइल परत केले. छोटू त्यांना जवळच सोडून पसार झाला. त्यानंतर मुलांनी कुटुंबाशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी मुलांसह एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेतली. मध्यरात्री उशिरा छोटूसह १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमका प्रकार काय ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा व सचिन एकाच ट्यूशनमध्ये शिकतात. काही दिवसांपूर्वी रेखाने सचिनसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. सचिनने प्रतिसाद दिला नाही. त्यातून त्यांच्यात वाद होते. आठवड्यापूर्वी रेखाने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यात वाद झाले होते. हा प्रकार कुटुंबापर्यंत देखील गेला होता. मुलीने सांगितल्यानंतर गुंडांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला.