औरंगाबाद : प्रत्यारोपणसाठी सर्व तपासण्या झाल्या आणि आवश्यक परवानगीही प्राप्त झाली. परंतु त्याच वेळी रुग्णाला कोरोना झाल्याने प्रत्यारोपण पुढे ढकलावे लागले. कोरोनावर यशस्वी उपचार झाल्यानंतर प्रत्यारोपणाची तयारी करण्यात आली. पण, आता दात्यालाही नकळत कोरोना होऊन गेल्याचे समोर आले. रुग्ण व दाता दोघेही कोरोना संसर्गातून सावरले, तेव्हा भिन्न रक्तगटाचे प्रत्यारोपण करण्याचे आव्हान उभे राहिले. हे आव्हान मेडिकव्हर हॉस्पिटल व सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथील किडणी प्रत्यारोपण चमूने स्वीकारले आणि रुग्णाला भिन्न रक्तगटाचे किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले. पुसद, जिल्हा यवतमाळ येथे राहणाऱ्या पुरुषाला (रक्तगट ओ पॉझिटिव्ह) वयाच्या ५३व्या वर्षी किडनी आजाराचे निदान झाले. काही वर्षे त्यांनी नांदेड, नागपूर, हैदराबाद येथे औषधोपचार घेतला. परंतु किडनीचा आजार वाढत गेला आणि २०२०मध्ये डायलिसिसची सुरुवात झाली. किडनी प्रत्यारोपण हाच त्यांच्या आजारावरचा पर्याय असल्याचे निदान झाले. परिवारातीलच किडनी दाता तयार झाला. परंतु त्याचा रक्तगट (बी पॉझिटिव्ह) वेगळा होता. भिन्न रक्तगटाचे किडनी प्रत्यारोपण औरंगाबाद येथे होत असल्याने रुग्णाने पुढील उपचार किडनीविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांच्या देखरेखीखाली मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सुरू केले.
प्रत्यारोपणापूर्वी रक्तगट जुळवण्यासाठी आवश्यक उपचार मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे करण्यात आले आणि नंतर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे यशस्वीपणे पार पडली. सदर शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूमध्ये डॉ. अजय ओसवाल, डॉ. सचिन सोनी, डॉ. देवदत्त पळणीटकर, डॉ. वैशाली चौरे, डॉ. फारुख यांचा समावेश होता. रुग्ण व दाता दोघेही कोरोना संसर्गातून सावरल्यानंतर भिन्न रक्तगटाची यशस्वी किडणी प्रत्यारोपणाची औरंगाबादेतील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची माहिती धूत हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता आणि मेडिकव्हर हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख व मुख्य प्रशासक डॉ. नेहा जैन यांनी दिली. कोरोना संसर्गामुळे शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत होण्याची भीती होती. परंतु अत्यंत दक्षतापूर्वक केलेल्या उपचारामुळे दोन्ही रुग्ण ठणठणीत आहेत, असे मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉ. संतोष यादव यांनी सांगितले.
फोटो ओळ...
किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णासोबत डॉ. संतोष यादव, नेहा जैन, डॉ. हिमांशु गुप्ता, रवी भट्ट, डॉ. सचिन सोनी, डॉ. अजय ओसवाल, डॉ. फारुख, डॉ. वैशाली चौरे, परिचारिका आदी.