कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक कार्यक्रम करता येत नसला तरी, प्रत्येक किसानपुत्राने १८ जून रोजी काळी फीत लावून शेतकऱ्यांना गुलाम करणाऱ्या या घटनादुरुस्तीचा निषेध करावा, असे आवाहन अमर हबीब यांनी केले आहे.
घटना स्वीकारल्यानंतर अवघ्या दीड वर्षात, घटनेच्या अनुच्छेद ३१ ए व बीमध्ये दुरुस्ती करून मूळ घटनेत नसलेल्या परिशिष्ट ९ ची निर्मिती करण्यात आली. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही, अशी तजवीज करण्यात आली. आज या परिशिष्टात २८४ कायदे असून, त्यापैकी सुमारे २५० कायदे थेट शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित आहेत. हा योगायोग नसून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना गुलाम बनविण्यात आले आहे. सीलिंग, आवश्यक वस्तू हे नरभक्षी कायदे या परिशिष्टात टाकल्यामुळे ते गेली अनेक वर्षे टिकून राहिले आहेत. हे कायदे म्हणजे विषारी साप आहेत व परिशिष्ट ९ हे त्यांचे आश्रयस्थान आहे, असे हबीब यांनी म्हटले आहे.