औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हाताशी धरून राज्यात महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्यात भाजपला यश आल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे, ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे. आघाडी सरकारच्या विरोधात बंड करण्यात जिल्ह्यातील पाच शिवसेनेच्या आमदारांचा समावेश असून त्या सर्वांसह भाजपतील तीन आमदारांना मंत्रिपदी वर्णी लागण्याची इच्छा असून त्यातील अनेकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यामार्फत लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.
आता शिंदे गटातील जिल्ह्यातील मंत्र्यांनीही डॉ. कराड यांच्याकडे मंत्री होण्यासाठी ‘शब्द’ टाकावा, यासाठी फोन करून विनवणी केल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेतून बंड करत बाहेर पडून मुख्यमंत्री झालेले शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार सामील झाले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात पाच आमदार आघाडीवर राहिले आहेत. त्यात दोन मंत्री सहभागी आहेत. त्यातील संदीपान भुमरे हे तर कॅबिनेट मंत्री आणि अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री आहेत. बंडखोरीमुळे शिवसेनेने त्यांची मंत्रिपदे काढून घेतली, तरी या बंडखोर आमदारांनी आता मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. आ. संजय शिरसाट यांनी पालकमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवात केली असून आ. प्रदीप जैस्वाल यांनाही एखादे खाते मिळण्याची अपेक्षा आहे. आ. रमेश बोरनारे यांनाही मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. शिरसाट आणि जैस्वाल यांनी डॉ.कराड यांना खील आमच्यासाठी ‘शब्द’ टाकण्याची विनंती केल्यामुळे मंत्रिमंडळात प्रचंड रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्रीय मंत्री काय म्हणाले...?शहरात कोण मंत्री होणार, यावर सध्या काही बोलता येणार नाही. ज्या दिवशी सत्तांतर झाले, त्या दिवशीपासून आ.अतुल सावे, प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे इच्छुक आहेत. आ.संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल यांचाही फोन आला. आमचे तीन इच्छुक आहेत. शिंदे गटातील दोघांनी फोन केला. पाच जण इच्छुक आहेत. याबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील हे निर्णय घेतील.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री