वाळूज महानगर: बियाणांच्या गोदामावर माल भरण्यासाठी गेलेल्या ट्रक चालकावर चौघांनी चाकूहल्ला केला. ही घटना सोमवारी पहाटे करोडी शिवारातील एस.के. इंटरप्रायजेस गोदामावर घडली. यात ईश्वर संजय कोंडके (२२, रा. रांजणगाव ता. फुलंब्री) हा गंभीर जखमी झाला आहे.
ईश्वर कोंडके व संजय (पूर्ण नाव माहिती नाही) हे करमजित सिंह यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करतात. ईश्वर हा एक ट्रक (एमएच- २६ एडी- २९४४) , तर संजय हा (एमएच- २६ एडी- २७४४) हा दुसरा ट्रक घेवून रविवारी रात्री करोडी शिवारातील एस.के. इंटरप्रायजेस या गोदामावर बियाणाचा माल भरण्यासाठी गेले होते. ईश्वर याच्या ट्रकमध्ये माल भरण्यात आला.
परंतू उशीर झाल्याने व पाऊस सुरु असल्याने संजय याचा ट्रक सोमवारी सकाळी भरण्यात येईल, असे गोदामातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे दोघांनी गोदामासमोरच दोन्ही ट्रक उभा केले. जेवण करुन दोघे ट्रकमध्येच झोपले.
दरम्यान, सोमवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ४ अनोळखी तरुण संजयच्या ट्रकजवळ गेले. व त्यास जबर मारहाण करुन चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील ६ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर या चौघांनी ईश्वरला झोपेतून उठविले. मात्र ईश्वर अनोळखी तरुण पाहून संशय आला. त्यामुळे याने लगेच ट्रक चालू केला.
ट्रक चालू करताच या तरुणांनी ट्रकच्या केबिनवर दगडफेक करुन केबिनच्या काचा फोडल्या. केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका तरुणाने ईश्वरच्या उजव्या पायावर चाकूने वार केला. त्यानंतर चौघांनी ईश्वरला जबर मारहाण केली. त्याच्याजवळील ६ हजार व ५ हजार रुपये किंमतीचे हातातील चांदीचे ब्रासलेट काढून घेतले.
दरम्यान, चोरटे पसार होताच ईश्वरने मालक करमजित सिंग यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सकाळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.