औरंगाबाद : कोहिनूर शिक्षण संस्थेच्या खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षणाच्या धंद्याला लगाम लावण्यासाठी विद्यापीठाने मोठा दणका दिला आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक, प्रशासकीय अनियमितता व पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून विनाअनुदान तत्त्वावर सुरू असलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त तुकड्या तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. एवढेच नव्हेतर, या महाविद्यालयाला ५ लाख रुपयांचा दंडही आकारला आहे.
यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून सोमवार, ११ जुलै रोजी महाविद्यालयास हे आदेश बजावले आहेत. मागील महिन्यामध्ये कुलगुरू डॉ. येवले यांनी या महाविद्यालयास अचानकपणे भेट दिली होती. तेव्हा तिथे कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्या. तिथे अद्ययावत प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय नाही. नियमित प्राचार्य, अभ्यासक्रमनिहाय अध्यापक नियुक्त केलेले नाहीत. ‘नॅक’ मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन कक्ष नाही, अल्पसंख्याक दर्जा असतानाही या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या जागांवर प्रवेश दिल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला कारणे दर्शक नोटीस बजावली होती. नोटीसचे समाधानकारक उत्तर नसल्यामुळे प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समितीने २७ जून रोजी महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. या समितीने २८ जून रोजी आपला अहवाल व प्रत्यक्ष भेटीचे छायाचित्रण विद्यापीठास सादर केले. ४ जुलै रोजी विद्यापीठाने चौकशी समितीचा निष्कर्ष महाविद्यालयास कळविला. त्यानंतरही महाविद्यालय व्यवस्थापन समाधानकारक खुलासा व कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरले. त्यानंतर ७ जुलै रोजी अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत या महाविद्यालयास दोषी ठरवून कारवाईची शिफारस केली.
काय झाली कारवाई?या महाविद्यालयात सुरू असलेल्या बीए अभ्यासक्रमाच्या ३ विनाअनुदानित तुकड्या, बीएस्सीच्या ३ विनाअनुदानित तुकड्या तसेच बीकॉमची १ विनाअनुदानित तुकडी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या समाजशास्त्र, मराठी, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, मानसशास्त्र, एम.एस्सी प्राणीशास्त्र, संगणकशास्त्र, ऑर्गेनिक केमिस्ट्री, ड्रगकेमिस्ट्री, पदार्थविज्ञान, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, गणित आाणि एमकॉमचे प्रवेश २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी बंद करण्यात आले असून ५ लाखांचा दंड आकारला आहे. पंधरा दिवसांत दंडाची रक्कम न भरल्यास दंडाच्या रकमेवर ७ टक्के व्याज आकारण्याचे आदेश कुलगुरु डॉ. येवले यांनी दिले आहेत.