- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांचे औरंगाबाद लोकसभेसाठीचे नाव वंचित बहुजन आघाडीच्या आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीतून बाद झाले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज मुंबईत ३७ उमेदवारांची नावे जाहीर केली. उर्वरित नावे लवकरच जाहीर होणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्वत: बाळासाहेबांनी परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावे जाहीर के ली होती. त्यात माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांचे नाव होते. आम्ही जाहीर केलेल्या २२ जागा आम्हाला सोडा, असा प्रस्तावच नंतर बाळासाहेबांनी काँग्रेसला दिला होता. आधी बारा जागा मागितल्या होत्या. नंतर त्या अशा पद्धतीने २२ झाल्या होत्या. त्यात कोळसे पाटील हे नाव होते. दुसरीकडे स्वत: कोळसे पाटील हे मला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास मी निवडणूक लढण्यास तयार आहे, असे सांगत होते. आता या नावावरून वंचित बहुजन आघाडीतच नाराजी पसरल्याचे व या आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या एमआयएममध्ये तर प्रचंड नाराजी असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या ताज्या यादीत कोळसे पाटील यांचे नाव नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे.
काँग्रेसने मला पाठिंबा द्यावादरम्यान, कोळसे पाटील हे देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखालील जनता दल सेक्युलरचे औरंगाबादचे उमेदवार असतील, असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात या प्रतिनिधीने कोळसे पाटील यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले, होय. मी जनता दल सेक्युलरचाच उमेदवार आहे. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही आमचे काही म्हणणे नाही. काँग्रेसने मला पाठिंबा द्यावा, असा माझा आग्रह आहे. पाच महिन्यांपूर्वीच कोळसे पाटील यांची जनता दलाच्या सेक्युलरच्या अ. भा. सरचिटणीसपदी स्वत: देवेगौडा यांनी नियुक्ती केली आहे. काँग्रेस-जनता दल आघाडीत औरंगाबादची जागा जनता दलाला सुटावी, असे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात देवेगौडा आणि सोनिया गांधी यांची बोलणी झालेली आहे. कोळसे पाटील यांना शहरातील डावे, समाजवादी व परिवर्तनवादी पक्षही पाठिंबा देतील, असे जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजमल खान यांनी सांगितले.
‘त्याला’ पाठिंबा... नांदेड येथे मी, असदुद्दीन ओवेसी, आ. इम्तियाज जलील अशी बैठक झाली होती. त्यावेळी आम्ही लोकसभा लढणार नाही. विधानसभेत आम्हाला अधिक रुची आहे, असे एमआयएमतर्फे सांगितले गेले. आता एमआयएमतर्फे इम्तियाज जलील यांना औरंगाबादची जागा लढवायची आहे. यासंदर्भात स्वत: ओवेसी, देवेगौडा आणि इम्तियाज जलील यांनी काय ते ठरवावे. त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहील. वेगळा उमेदवार राहणार नाही, असे स्वत: बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर करून बॉल ओवेसींच्याच कोर्टात टाकून दिला आहे.
जलील यांची कडक भूमिकाऔरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढविली नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पूर्णत: विस्कळीत होईल. लोकसभेनंतर विधानसभेला सामोरे जायचे आहे. तेव्हा काय करायचे? आणि एकही जागा लढवायची नसेल तर आपण राजकीय पक्ष कसे, असा सवाल जलील यांनी एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांनाच विचारला. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढविण्याबाबतचा रेटा असल्याची माहिती जलील यांनी ओवेसी यांना दिली व लवकरच त्यांना निर्णय अभिप्रेत आहे. त्यांनी सांगितले, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेले उमेदवार कोण, असा प्रश्न जेव्हा एमआयएममधील कार्यकर्ता विचारतो, तेव्हा त्याला उत्तर देणे अवघड जाते. ते केवळ माजी न्यायमूर्ती आहेत म्हणून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे हा कसला निकष, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. आता वंचित बहुजन आघाडी बाजूला सरकली असून, देवेगौडा आणि ओवेसी यांनी काय ते ठरवावे, असे स्पष्ट झाले आहे.