जालना : शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे. परिणामी वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगर परिषदेचे दोन कोंडवाडे असले तरी प्रत्यक्षात पालिकेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबविली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. विकासाच्या प्रगतीकडे झेपावणाऱ्या जालना शहरात सध्या सिमेंट क्राँक्रिट रस्त्याची कामे सुरु आहेत. परिणामी पादचाऱ्यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. मात्र, आताचा थोडासा त्रास आगामी कालावधीत खड्डेविना प्रवासाचा होणार असल्याने वाहनचालकही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.शहरातील मामा चौक, सिंधी बाजार, छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, मंमादेवी मंदिर परिसर, गांधी चमन, बसस्थानक परिसर, महावीर चौक, दाना बाजार, जुना मोंढा, भोकरदन नाका, पाणीवेस, शनि मंदिर परिसर, महात्मा फुले मार्केट, अलंकार चौक, टांगा थांबा हे प्रमुख चौक व परिसर आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमी वाहनांची वर्दळ असते. परंतु, याच ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यांवर थांबत आहेत. सकाळी, सायंकाळी पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मार्ग काढणेही कठीण होत आहे. शहरात जवळपास ६०० पेक्षा जास्त मोकाट जनावरे आहेत. परंतु, पालिकेचे अधिकारी हे केवळ शंभरच्या जवळपास अशी जनावरे असल्याचे सांगून फारसे गांभीर्य दाखवित नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांबरोबरच वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
कोंडवाडे मोकळे; जनावरे रस्त्यांवर !
By admin | Published: January 17, 2017 11:08 PM