छत्रपती संभाजीनगर : परभणी तालुक्यातील कोथळा येथील कोल्हापुरी बंधारा मानवत तालुक्यातील कोथळा येथे दाखवून लाखो रुपयांची बिले उचलण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या अनुषंगाने संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांची जबाबदारी, कामातील शिथिलता याबाबत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश अवर सचिवांनी प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोथळा (ता.परभणी) येथील कोल्हापुरी बंधाऱ्यासंदर्भात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांनी द्विस्तरीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला चौकशी अहवाल गेल्या मार्च महिन्यात शासनास सादर केला. यात संबंधित जलसंधारण अधिकाऱ्याने सादर केलेली कागदपत्रे आणि मूळ कागदपत्रे यात चौकशी समितीला तफावत आढळून आली. त्यामुळे चौकशी समितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आपला अहवाल सादर केला. यात संबंधित जलसंधारण अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. मात्र हा अहवाल गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात पडून होता.
यावर आता मृद व जलसंधारण विभागाच्या अवर सचिवांनी २० ऑगस्ट रोजी प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांकडून सुस्पष्ट अहवाल मागविला असून या प्रकरणातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून या कामात कोणी हलगर्जीपणा केला, याची माहिती मागविली आहे. त्यामुळे जलसंधारण विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
चौकशी अहवालातील निष्कर्ष:- जलसंधारण अधिकारी (परभणी) यांनी सादर केलेल्या कागदपत्रात तफावत आढळून आली आहे.- सदरील बंधारा परभणी तालुक्यात बांधलेला नसून मानवत तालुक्यात बांधला असल्याचे दिसून येते.- प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक, कार्यारंभ आदेश, गुण नियंत्रण चाचणी निष्कर्ष तपासले असता सर्व दस्तऐवजांवर कोथळा ता. परभणी असा उल्लेख आढळून येतो.