कुलकर्णी म्हणाले, ‘मी मायक्रो मायनॉरिटी’; अंबादास दानवे म्हणाले, ‘मला आशीर्वाद द्या...!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:47 PM2019-08-02T16:47:19+5:302019-08-02T16:50:30+5:30
काँग्रेस आघाडीचे कुलकर्णी आणि महायुतीचे दानवे झाले आमने-सामने
औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी आमने-सामने झाले.
दानवे यांनी कुलकर्णी यांच्या पायाला वाकून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करताच कुलकर्णी म्हणाले, दानवे मी मायक्रो मायनॉरिटी आहे. या म्हाताऱ्याला जाऊ द्या. त्यावर दानवे यांनी मला आशीर्वाद असू द्या, म्हणत कुलकर्णी यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांचे आशीर्वाद घेतले. कुलकर्णी यांनी चमत्कार करून दाखवील, माझे गणित एकदम चांगले आहे, असा दावा केला तर दानवे यांनीदेखील आशीर्वादावर विजय होण्याचा संकल्प केला. कुलकर्णी आणि दानवे यांच्यातील खेळीमेळीचा संवाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात जोरदार हंशा पिकवून गेला.
महायुती आणि आघाडीचे उमेदवार आमने-सामने झाल्यानंतर या कलगीतुऱ्याने काही क्षणासाठी निवडणुकीचे वातावरण असल्याचे विसरण्यास भाग पाडले. महायुतीकडून दानवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खा. चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले आदींची यावेळी उपस्थिती होती. कुलकर्णी यांचा अर्ज दाखल करताना आ.सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदींची उपस्थिती होती. कुलकर्णी यांनी अर्ज २ दिवसांपूर्वीच दाखल केला होता. गुरुवारी बी-फॉर्म त्यांनी सादर केला.
७ उमेदवारांचे १२ अर्ज
या निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महायुतीकडून अंबादास दानवे यांचे ४ अर्ज, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी यांचे २, अपक्ष विशाल नांदरकर १, नंदकिशोर सहारे यांचे २, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख १, तात्यासाहेब चिमणे १, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांचा १, असे १२ अर्ज सहायक निवडणूक अधिकारी संजीव जाधवर यांच्याकडे दाखल करण्यात आले. २ आॅगस्ट रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १० हजार रुपये अनामत रक्कम होती.
मतदार झाले ६५७
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील फुलंब्रीतील एका सदस्याचे पद रद्द केल्यामुळे ६५६ मतदार होते. सदरील सदस्य कोर्टात गेल्यामुळे त्याचे पद वैध ठरल्याने आता पुन्हा ६५७ मतदारसंख्या झाली आहे. ३८५ औरंगाबाद जिल्ह्यात तर २७२ जालना जिल्ह्यातील मतदार आहेत.
दानवे साहेब... या म्हाताऱ्याला पुढे जाऊ द्या, असे म्हणत आघाडीचे उमेदवार कुलकर्णी यांनी महायुतीचे उमेदवार दानवे यांची गळाभेट घेतली, तर आशीर्वाद घेण्यासाठी दानवे हे कुलकर्णीच्या पायाला वाकले.