लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तसेच पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शहरातील कुंडलिका नदीचे खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. जालना शहरातून कुंडलिका आणि सीना नदी वाहते. पैकी कुंडलिका नदीवरील रामतीर्थजवळील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाऱ्यापासून नदीचे खोलीरकण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार होता. त्यातच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गतवर्षी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हा विषय मागे पडला. आता जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी पुढाकार घेतला असून, यासाठी लागणारा निधीही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरपालिका प्रशासनाने नदीतील कचरा डम्पिंग ग्राऊंड नेवून टाकावा, असे पत्र जिल्हाधिकारी जोंधळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले आहे. त्यानुसार पालिकेच्या वतीने लवकरच नदीतील कचरा उचलण्यात येणार आहे. त्यानंतर रामतीर्थजवळील बंधाऱ्यापासून या नदी खोलीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात या कामास सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.
कुंडलिका नदी घेणार अखेर मोकळा श्वास!
By admin | Published: July 15, 2017 12:43 AM