पैठण (औरंगाबाद): समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मुलनासाठी पैठण नगर परिषदेने मंगळवारी प्रशासकीय ठराव घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींनी घेतलेल्या विधवा प्रथा निर्मुलन ठरावाचे आता शासन आदेशात रूपांतर झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण नगर परिषदेने आणि सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन विधवा प्रथा निर्मुलनाचा संकल्प करण्याचे क्रांतिकारी पाऊलं टाकले आहे.
विधवांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे यासाठी ग्रामपंचायत हेरवाड (ता . शिरोळ जि . कोल्हापूर) व माणगाव ग्रामपंचायतींनी दि. ५ मे २०२२ रोजी मंजूर केलेल्या ग्रामसभेचा ठराव मोठा क्रांतिकारक ठरला असून विज्ञान युगात जगत असताना विधवांच्या कुचंबनेकडे या ठरावाने देशाचे लक्ष वेधले. महिला व बालविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायती, नगर परिषदांनी असा ठराव घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. यानुसार पैठण नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी डॉ. स्वप्नील मोरे व मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी मंगळवारी प्रशासकीय ठराव मंजूर केला. ठरावानुसार पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यांसारख्या कूप्रथांचे पैठण शहरात पालन केले जाणार नाही, असे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले.
चिंचखेडा ग्रामपंचायतने घेतला ठरावसिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा ग्रामपंचायतमध्ये आज सरपंच रुखमनबाई कचरू वाणी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेण्यात आली. त्यात समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ठ विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संतोष बकले यांनी मांडला. त्याला लक्ष्मीबाई वाणी यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने हा ठराव संमत केला. त्यानंतर विस्तार अधिकारी पी.बी. दौड, प्रशांत जोशी, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी या ठरावाचे पालन करण्याची शपथ घेतली.
व्यापक जनजागृती करण्यात येईल राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत पैठण नगर परीषदेने अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे बाबतचा ठराव मंजूर केला आहे. होर्डिंग, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याद्वारे याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.- संतोष आगळे, मुख्याधिकारी, पैठण