माजलगाव : पत्नी सासरी येत नसल्याच्या कारणावरुन पती दादाराव ऊर्फ अनिल उजगरे याने तिच्या डोके व हातावर कुऱ्हाडीने घाव घातले. याप्रकरणी पतीस माजलगाव सत्र न्यायालयाचे न्या.डी.जी. राजे यांनी तीन वर्षांची शिक्षा सुनावली.वडवणी येथील दादाराव ऊर्फ अनिल उजगरे याचे लग्न गावातील अनिता हिच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुखाचा होता; मात्र तीन वर्षांच्या कालावधीनंतर पती अनिल हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. संशयाच्या कारणावरुन अनिल तिला सतत मारहाण करू लागला. बहुतांश वेळा तिला उपाशीही ठेवत असे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अनिता ही वडवणी येथील वसंतराव नाईक चौकात असणाऱ्या माहेरच्या घरी २६ फेब्रुवारी २०१५ रोजी गेली. तिच्या पाठीमागे अनिल गेला. ‘तू नांदावयास नाही आल्यास, तुला जिवे मारीन’, अशी धमकी देत मारहाण केली. पतीच्या मारहाणीच्या भीतीने ती आईजवळच थांबली. ७ मार्च २०१५ रोजी अनिल हा कुऱ्हाड घेऊन आला व अनिताच्या डोक्यावर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले. तिला तात्काळ बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. वडवणी पोलिसांनी दोषारोपपत्र माजलगाव सत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी सरकारी वकिलांनी १० साक्षीदार तपासले. सरकारी वकील अॅड. रणजित वाघमारे यांचा युक्तिवाद मान्य करीत न्या. राजे यांनी आरोपी अनिल उजगरे यास ३९८ अ नुसार ३ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपये दंड सुनावला. अॅड. वाघमारे यांना अॅड. तांदळे, अॅड.बी.एस. राख यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
कुऱ्हाडीने मारहाण केली; पतीस शिक्षा
By admin | Published: September 05, 2016 12:30 AM