छत्रपती संभाजीनगर :जर्मनीच्या इंगोलस्टॅड शहरासोबत छत्रपती संभाजीनगर महापालिका लवकरच विविध सामंजस्य करार करणार आहे. महापालिका, खासगी शाळांमधील ३० ते ६० विद्यार्थी स्टुडंटस् एक्सचेंज प्रोग्रॅमअंतर्गत दोन महिन्यांसाठी इंगोलस्टॅड शहरात पाठवले जातील, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी दिली.
प्रशासकांसह शहर अभियंता ए. बी. देशमुख, स्मार्ट सिटीच्या मीडिया विश्लेषक अर्पिता शरद नुकतेच जर्मनी दौऱ्याहून परतले. जर्मनीच्या इंगोलस्टॅड शहराबरोबर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने २०२१ साली सिस्टर सिटीचा करार केला आहे, त्या निमित्याने आणि एशियन महापालिका परिषदेच्या निमित्याने मनपा अधिकारी जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. इंगोलस्टॅड शहरासोबत जगातील नऊ शहरांसाेबत करार आहेत, त्या नऊपैकी छत्रपती संभाजीनगर एक आहे. जर्मनीबद्दल भरभरून बोलताना प्रशासक म्हणाले की, तेथे शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. बहुतांश शाळा सरकारी आहेत. सर्व घटकातील विद्यार्थी सरकारी शाळेतच शिक्षण घेतात. इंगोलस्टॅड शहरासोबत स्टुडंटस् एक्सचेंज प्रोग्रामबद्दल चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरवर्षी विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथून इंगोलस्टॅड शहरात पाठवले जावेत, तेथील विद्यार्थी देखील येथे यावेत, अशी या मागची कल्पना आहे. साठ विद्यार्थ्यांमध्ये महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा देखील समावेश असेल, असे जी. श्रीकांत म्हणाले. ज्यांची आर्थिक क्षमता आहे, ते स्वखर्चाने जातील. ज्यांची क्षमता नाही त्यांना स्पॉन्सरशिप मिळवून दिली जाईल.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विकसित केलेल्या स्मार्ट गुरू ॲपचे व सावित्रीबाई कंट्रोल रूमचे सादरीकरण त्या ठिकाणी करण्यात आले. स्मार्ट गुरू ॲपची संकल्पना इंगोलस्टॅड शहराच्या प्रशासकीय यंत्रणेला आवडली. अशा प्रकारची यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने त्यांनी चर्चा केल्याची माहिती जी. श्रीकांत यांनी दिली.