बीड : दरवर्षीपेक्षा महिनाभराच्या उशिराने ज्वारी काढणीची कामे सुरू झाली आहेत. काढणी कामासाठी मजुरांची टंचाई निर्माण होऊ लागल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. महिलांसाठी ३०० तर पुरूषांसाठी ५०० रूपये मजुरी देऊनही मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काढणी कामे रखडत आहेत.रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा एकाच वेळी काढणीला आला असून, शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. दरवर्षी गुत्तेदारी पद्धतीने ज्वारीची काढणी केली जात असे. मात्र, यंदा मजुरी वाढवून देखील काढणी कामांकडे पाठ फिरवली जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्याने काढणीला आलेली ज्वारी तडकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. यंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे ज्वारीला तीन ते चार वेळा पाणी मिळाले आहे. चांगल्या प्रतीच्या शेतजमिनीवरील ज्वारी काढणी जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांनी चक्क ऊसाप्रमाणे ज्वारीलाही कोयता लावून काढणीची कामे उरकण्यावर भर दिला आहे. (प्रतिनिधी)
ज्वारी काढणीला मजुरांची टंचाई
By admin | Published: February 26, 2017 12:52 AM