औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कांबळे नावाचे कर्मचारी ओळखीचे असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून एका महिलेकडून दहा हजारांची लाच घेणाऱ्या एका मजुराला अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी अटक केली.राजेश बाबूलाल खरे (४०, रा. कैलासनगर, गल्ली नंबर ४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपंग कल्याण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्यात येते. सदर महिलेची मुलगी आणि बहीण अपंग आहेत. स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्याची माहिती जाणून घेण्यासाठी त्या जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात गेल्या. तेथे त्यांना राजेश खरे भेटला. त्यावेळी त्याने त्यांना या कार्यालयातील कांबळे हे आपल्या ओळखीचे असून त्यांच्यामार्फत तुमच्या बहीण आणि मुलीसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. आवश्यक कागदपत्रांची माहिती त्याने दिली व अन्य लोकांच्या कर्जाच्या फाईल्सही दाखविल्या. प्रत्येक फाईलकरिता २० हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. अॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी पंचाकडून याबाबत सत्यता जाणून घेतली. तेव्हा पंचासमक्ष खरे याने तडजोड करून दहा हजार रुपये २४ नोव्हेंबर रोजी दुपारी आणून देण्याचे सांगितले. दुपारी कैलासनगर येथील सातपुते यांच्या घरी १० हजारांची लाच घेताना त्यास पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक रामनाथ चोपडे, निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, नीलेश देसले, कर्मचारी श्रीराम नांदुरे, हरिभाऊ कुऱ्हे, अश्वलिंग होनराव, बाळासाहेब महाजन यांनी सापळा रचला होता. ४महिलेने त्याच्याकडे चार फाईल दिल्या होत्या. त्याकरिता महिलेने वर्षभरात टप्प्याटप्प्याने खरे यास ८० हजार रुपये दिले. त्यानंतरही खरे याने १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे आणखी २० हजारांची मागणी केली. महिलेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली.
मजूर अॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात
By admin | Published: November 25, 2014 12:42 AM