औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. दिवाण देवडी भागात पोलिसांनी ही कारवाई केली.
दंगलीमागे लच्छू पहिलवान असल्याचा आरोप एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केला होता. या घटनेनंतर त्याचा या दंगलीशी काही संबंध आहे का, याविषयी पोलीस तपास करीत होते. दंगलीसोबतच तोडफोड आणि जाळपोळीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. शहरात झालेल्या दंगलप्रकरणी काल राजेंद्र जंजाळ आणि फेरोज खान या दोन नगरसेवकांना अटक केल्यानंतर आज पोलिसांनी ही कारवाई केली.
दंगलीत तो सक्रिय होता, असा संशय पोलिसांना होता. चार दिवसांपासून एसआयटी त्याच्याविरोधात पुरावे गोळा करीत होते. दोन दिवसांपासून मात्र तो पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना बुधवारी रात्री तो दिवाणदेवडी येथील त्याच्या एका मित्राच्या घरी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिली. आयुक्तांच्या आदेशाने एसआयटीतील पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, कर्मचारी मनोज उईके, दादासाहेब झारगड, सचिन संकपाळ, विनोद खरात आणि योगेश तळवंदे यांच्या पथकाने सापळा रचला. तो तेथे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लच्छूला चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. त्याला दंगल करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.