बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. दिवसाकाठी ५० ते ६० रक्तपिशव्यांची गरज भासते; मात्र त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा जाणवतो.यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. परिणामी रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात घेतली जात असल्याने जिल्हा रुग्णालयाकडे रक्तपिशव्या कमी येतात. सव्वातीनशे खाटांच्या रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. त्यांना रक्ताची गरज भासल्यास पुरवठा करण्यासाठी विलंब लागतो. अनेक वेळा रुग्णांना खाजगी ब्लड बँकेचा सहारा घ्यावा लागतो. दरवर्षी मार्चनंतर जिल्हा रुग्णालयात रक्त्याच्या पिशव्यांची कमतरता भासते. मात्र, यावेळी रुग्णालय प्रशासनाने योग्य नियोजन, विविध शिबिरांच्या माध्यमातून रक्त संकलनाचे काम केले होते. त्यामुळे मे महिन्याच्या अर्ध्यापर्यंत तुटवडा भासला नाही. मात्र, मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रकतदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त संकलन कमी झाले. रुग्णांचे नातेवाईक रक्ताची पिशवी घेण्यासाठी रक्तपेढीत जातात तेव्हा उपलब्धता नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे गोरगरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतात. यामध्ये प्रसुतीनंतर सिझर झालेल्या महिला रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता भासते. मात्र, रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांना खासगी रक्तपेढीचाही आधार घ्यावा लागतो. जिल्हा रुग्णालयातून इतर तालुक्यांमध्येही रक्तपुरवठा केला जातो. नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात येऊन रक्तदान करण्याचे आवाहनही रुग्णालय प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा रुग्णालयात रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रक्ताची अत्यंत आवश्यकता भासत आहे. शिबिरांचे प्रमाण कमी झाले असून, रक्त संकलनात घट झाली आहे. सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त संकलनात सहकार्य करावे.- डॉ. नागेश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
रक्ताचा तुटवडा
By admin | Published: May 21, 2016 11:38 PM