- राम शिनगारे
औरंगाबाद : अभियांत्रिकी, वैद्यकीयसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामागे सीईटी सेलच्या १८ जूनच्या ‘मेल’ची भूमिका असल्याने गुरुवारी हा मेल रद्द करण्यात आला. पाठोपाठ रात्री उशिरा नोंदणी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागातील समन्वयाच्या अभावातून हा घोळ झाल्याचे समोर आले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मनुष्यबळ आणि सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत सीईटी सेलने शासकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया राबविणार नसल्याचा धक्कादायक मेल मंगळवारी (दि.१८) सायंकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी तंत्रशिक्षण संचालक, सहसंचालक आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवला. गुरुवारी (दि.२०) दुपारी १ वाजता पुन्हा मेल पाठवत १८ जूनचा मेल ‘नजरअंदाज’ करण्याची सूचना केली. या मेल ‘कांडा’मुळे सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागातील समन्वयाचा अभावही समोर आला आहे.
राज्यातील शासकीयसह खाजगी महाविद्यालयातील वैद्यकीय, अभियांत्रिकीसह एकूण ५२ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. मागील तीन दिवसांपासून प्रवेश नोंदणीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे राज्यात गोंधळ उडाला होता. या गोंधळामागे सीईटी सेल आणि तंत्र शिक्षण संचालनालयातील मानापमान नाट्य असून, दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा गोंधळ उडाला. याविषयी सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही.
१८ जूनच्या मेलमधील मजकूरअभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुशास्त्र, एमबीए, एमसीए आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शासनाकडून व तंत्रशिक्षण संचालनालयाकडून नियमावली पुस्तिका व मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविणार नाही. याविषयी माहिती मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला अवगत केली आहे.
२० जूनच्या मेलमधील मजकूर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १८ जून रोजी आलेला मेल ‘नजरअंदाज’ करण्यात यावा.