लातूर : अपंग विभागाच्या राज्य आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या अनुदानित ७० अपंग शाळांची तपासणी आॅक्टोबर २०१६ मध्ये झाली होती. या तपासणीत ७० पैकी १२ शाळांमध्ये मानांकनानुसार सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय, दोन शाळा गायब असल्याचेही निदर्शनास आले आहे. परिणामी, या शाळांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, सात दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शासनाच्या अनुदानावर चालणाऱ्या शाळांमध्ये मानांकनानुसार सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी राज्याच्या अपंग विभागाच्या आयुक्तांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील ७० अपंग शाळांची तपासणी १४ व १५ आॅक्टोबर २०१६ रोजी करण्यात आली. ७० पैकी १२ शाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. निवासी असलेल्या या शाळांमध्ये दिव्यांगांना लागणारे दैनंदिन साहित्य नसल्याचेही निदर्शनास आले. अनुदान उचलूनही साहित्य पुरवठा दिव्यांग विद्यार्थ्यांना झाला नसल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तर दोन शाळा संबंधित जागेवर नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार या शाळांना बुधवारी नोटिसा बजावण्यात आल्या असून, ७ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खुलासा आल्यानंतर आयुक्तांसमोर सुनावणी होऊन कारवाईचा निर्णय होणार आहे़
मानांकनानुसार अपंग शाळांमध्ये सुविधांचा अभाव
By admin | Published: February 03, 2017 12:39 AM