औरंगाबाद : ज्ञानाचे क्षेत्र आणि ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया ही सदैव स्त्रियांना वगळणारी, स्त्रियांच्या अनुभवांना परिघीकृत करणारी आणि त्यांच्या योगदानाला अनुल्लेखणारी राहिली आहे. परिणामी, सर्व विषयांमध्ये स्त्रीविचारवंत हे अभावानेच दिसतात, अशी खंत प्रा. मैत्रेयी चौधरी यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित ‘स्त्रीवादी संशोधन पद्धतीशास्त्र’ या दहा दिवशीय लघु अभ्यासक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली. यानिमित्त प्रा. मैत्रेयी चौधरी यांनी ऑनलाइन मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. स्मिता अवचार होत्या. या अभ्यासक्रमामध्ये आसाम, नागालेंड, उत्तरप्रदेश, दिल्ली, हैद्राबाद, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र आदी देशभरातून शिक्षक व संशोधक सहभागी झालेले आहेत.
प्रा. मैत्रेयी चौधरी म्हणाल्या, पितृसत्ताक राजकारणाला प्रश्न्नांकित करून स्त्रीवादी अभ्यासकांनी केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम म्हणून आज सर्व अभ्यासशाखांमध्ये स्त्रीवादी दृष्टिकोणाचा समावेश करण्यात आलेला दिसतो; मात्र या समवेशातून संपूर्ण ज्ञानक्षेत्राची पुनर्रचना होण्याऐवजी केवळ स्त्रियांचे ‘टाका आणि ढवळा’, या पद्धतीने सुलभिकरण केले जात आहे, अशी भूमिका विषद करून त्यांनी स्त्रीवादी संशोधनाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली व संशोधकाने योग्य पद्धती, तसेच योग्य प्रश्न निवडणे का गरजेचे आहे, ते सांगितले. कारण योग्य प्रश्न विचारले तरच योग्य उत्तरे प्राप्त होऊ शकतात, असे प्रा. चौधरी म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निर्मला जाधव यांनी केले. वनिता तुमसरे यांनी सूत्रसंचालन केले, तर नागेश शेळके यांनी आभार मानले.