छत्रपती संभाजीनगर : दागिने खरेदी केले पण घरात ठेवले तर चोरी होण्याची भीती सतत मनात असते. त्यामुळे अनेक महिला बाहेरगावी जाण्याचेही टाळतात. सणासुद्धीला किंवा सहलीला जावेच लागते. न जाणे हा पर्याय होऊ शकत नाही. मात्र, आता नागरिक दागिने असो की महत्त्वाची कागदपत्रांची फाईल बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून बिनधास्त होत आहेत. यामुळे बँकेचे लॉकर कमी पडू लागले आहे. येथेही वेटिंग सुरू झाल्याने आता दागिने ठेवायचे तरी कुठे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
बँकांचे लॉकर किती रुपयांना?बँक राष्ट्रीयीकृत असो, खाजगी असो वा सहकारी प्रत्येक बँकेचे लॉकरचे नियम वेगवेगळे आहेत, तसेच त्यावर आकारण्यात येणारे वार्षिक भाडेही वेगवेगळे आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या बँकेतील लहान लॉकरसाठी दीड हजार रुपये, मध्यम लॉकरसाठी तीन हजार रुपये, मोठ्या आकारातील लॉकरसाठी ५ हजार तर अतिमोठ्या लॉकरसाठी ८ हजारपेक्षा अधिक वार्षिक भाडे आकारले जाते. हेच एसबीआय बँकेत १२ हजारापर्यंतही वार्षिक भाडे आहे. सहकारी बँकेत यापेक्षा वार्षिक भाडे थोडे कमी असते.
लॉकरसाठी प्रतीक्षा ३ ते ६ महिनेबँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकदा लॉकरमध्ये ग्राहकाने दागिने, महत्त्वाच्या फाईल ठेवल्या तर तो ग्राहक कमीत कमी वर्षभर तरी ते लॉकर ठेवतो. अनेकांनी मागील अनेक वर्षांपासून लॉकरवर ताबा ठेवला आहे. काही अडचण आली, बदली झाली तरच लॉकर खाली केले जाते. यामुळे तुम्ही बँकेत गेला व लगेच लॉकर मिळेल, असे नाही. तुम्हाला कमीत कमी ३ महिने ते ६ महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागते.
रहिवासी भागातील बँकेत लॉकर फुलरहिवासी भागात ज्या बँकांच्या शाखा आहे तेथील लॉकर फुल झाले आहेत. मात्र, ज्या शाखा व्यावसायिक भागात आहेत, तिथे मात्र लॉकर उपलब्ध होऊ शकतात.- हेमंत जामखेडकर, कोषाध्यक्ष, एआयसीबीईएफ