सुनील घोडके
खुलताबाद : यंदा मुबलक पाऊस असल्याने खुलताबाद, दौलताबाद आणि वेरूळ परिसरात सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र काेरोनामुळे सध्या पर्यटन बंद असल्याने अनेक विक्रेत्यांची सीताफळे विक्रीविनाच वाया जात आहेत.
यामुळे सीताफळ विक्रेते त्रस्त झाले असून यंदा पहिल्यांदाच ग्राहकांच्या शोधात फिरण्याची वेळ या व्यापाऱ्यांवर आली आहे. दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पन्न घेतले जाते. यंदा प्रारंभीपासूनच चांगला पाऊस असल्याने परिसरातील बहुसंख्य झाडे सीताफळांनी लगडलेली आहेत. परंतू सध्या या मार्गावरून भाविक, पर्यटक यांचे जाणे- येणे बंद झाल्याने शेतकऱ्यांना सीताफळाच्या विक्रीतून पैसे काढणे अवघड झाले आहे. दरवर्षी या दिवसांत सीताफळ विक्रीतून मोठ्या प्रमाणात होणारी उलाढाल यंदा ठप्प झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.