पालम : शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने बांधलेल्या शौचालयास कुलूप ठोकलेले दिसून येत आहे.
पालम तालुक्यात ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या १0५ शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास १0 हजार विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत शौचालयाचे बांधकाम केलेले आहे. परंतु, शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले असले तरी शाळेमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने शौचालयाला कुलूप लागलेले दिसत आहे. शाळेच्या परिसरात अनेक गावांत पाणी उपलब्ध नाही. पाण्याची साठवण करण्यासाठी पाण्याच्या टाक्याही नाहीत. यामुळे अडचणीत भर पडलेली आहे. शासन एकीकडे स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय ही मोहीम राबवित आहे. परंतु, पाण्याअभावी शौचालयांना लागलेल्या कुलूपांना गंज चढला आहे. या शाळांमध्ये पाण्याची सोय करुन शौचालय वापरात आणण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. /(प्रतिनिधी)
■ पालम तालुक्यात जवळपास सर्वच शाळांमध्ये शौचालयाच्या बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, काही शाळांमध्ये शौचालयाचे बांधकाम अर्धवट आहे. हे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या शौचालयाचा वापर करणे अवघड झाले आहे.