शहरापासून ३० किमीच्या परिघात असलेला लहूगड लेणी, मंदिर अशा समृद्ध वारशासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. औरंगाबादपासून चौका गावातून मधल्या मार्गे लाडसावंगीकडे जाणाऱ्या रस्त्याने गडावर पोहोचता येते. हा संपूर्ण मार्ग हिरवाईने नटलेला आहे. चौका गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर डाव्या बाजूस एक मोठा तलाव लागतो. तलावाचे सौंदर्य डोळ्यात साठवत या ट्रीपची सुरुवात होते. पुढे डोंगरातून नागमोडी जाणाऱ्या वाटा, त्यावरील छोटे पूल, खेडी यामुळे हा प्रवास सुरूच राहावा असेच वाटते. पुढच्या २० मिनिटांत आपण लहूगडला पोहोचतो. डोंगरावर चढून पुरातन लहूगड पाहणे एक वेगळा अनुभव आहेच. परंतु, शहर ते लोहगड हा निसर्गाच्या सान्निध्यातील प्रवास अविस्मरणीय ठरणारा आहे. फोटोग्राफी, रील्सच्या चाहत्यांसाठी ही ट्रीप तर पर्वणीच ठरते.
कसे जाल -
औरंगाबादपासून जळगाव रोडवर १५ किमीच्या अंतरावर चौका गाव आहे. येथून उजवीकडे लाडसावंगीकडे एक रस्ता जातो. या रस्त्याने पुढे गेल्यास काही अंतरावर मोरवीरा गाव लागते. येथून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यास ५ ते ६ किलोमीटरवर नांद्रा गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे लहूगडची कमान आहे. एक ते दीड किमीचा रस्ता पार केल्यास थेट गडावर जाता येते. हा संपूर्ण रस्ता चांगला आहे. यामुळे दुचाकी किंवा चारचाकीने आरामात अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
काय पाहाल -
लहूगड अत्यंत वेगळ्या बांधणीचा आहे. वळणदार पायऱ्या चढून वर गेल्यास उजवीकडे तीन गर्भगृह असलेली लेणी आहे. आत महादेवाची पिंड आहे. लेणीचे खांब, प्रवेशद्वारावर खूप रेखीव काम केलेले आहे. याच्या डाव्या बाजूने कमानीमधून जाणाऱ्या पायऱ्या थेट लेण्यावर घेऊन जातात. तसेच डावीकडेच पुढे गेल्यास पुन्हा वळणदार पायऱ्या आहेत. लेण्याच्यावर पाण्यासाठी कोरलेले हौद आहेत, तर उजवीकडे जात राहिल्यास आणखी काही लेण्या दिसतात. त्या राहण्यासाठी वापरत असाव्यात. तसेच वर डावीकडे चालत गेल्यास काही अंतरावर दोन अर्धवट लेण्या आहेत. गडाच्या समोरच्या डोंगरावर देखील लेणीचे अवशेष आहेत. गडावरून चौफेर पाहिल्यास विस्तीर्ण आकाश, डोंगर आणि शेती असे मनमोहक दृश्य दिसते.