छत्रपती संभाजीनगर : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टल बंद असल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्यभरातील लाखो मागासवर्गीय विद्यार्थीच हतबल झाले आहेत. पोर्टल कधी सुरळीत होईल, याचे उत्तर कोणाकडेच नाही. याशिवाय अर्ज भरण्याची ३० नोव्हेंबरची मुदत टळून गेल्यामुळे मुदतवाढ मिळणार की नाही, याबाबतही समाजकल्याण विभागाकडून कोणत्याही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नाहीत.
चालू शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन आणि नूतनीकरण ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीअगोदरच हे पोर्टल बंद पडले. अकरावी, बारावी तसेच त्यापुढील पारंपरिक पदवी अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे व अन्य ठिकाणी धाव घेतली; पण मागील दहा- पंधरा दिवसांपासून पोर्टल उघडतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधला. महाविद्यालयांनीदेखील प्राप्त अर्ज समाजकल्याणच्या जिल्हा कार्यालयाकडे ऑनलाइन सादर करण्यासाठी केलेला प्रयत्नही व्यर्थ गेला. त्यामुळे मुदतीत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.
समाजकल्याण विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टलमध्ये सुधारणा केल्या असून ते अद्ययावत केले जात असल्यामुळे ते बंद आहे. ते कधी सुरू होईल किंवा समाजकल्याण आयुक्तालयाकडून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ कधीपर्यंत मिळेल, त्याबाबत अद्यापही मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत.
जिल्ह्यात गतवर्षी ६७ हजार लाभार्थीगेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ३० हजार १०१ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील १५३ विद्यार्थी, अशा एकूण ६७ हजार २५४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात आली होती. यंदाही एवढेच किंवा यापेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी दावेदार असणार आहेत. मात्र, पोर्टलच बंद असल्यामुळे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.