परभणी : शहरात नळाच्या पाण्याचा अनावश्यक वापर करताना आढळल्यास संबंधिताविरुद्ध एक लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी मंगळवारी काढले आहेत. परभणी शहरात राहाटी येथील बंधाऱ्यातून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरात मागील चार महिन्यांपासून टंचाईची स्थिती आहे. सद्य:स्थितीला आठ ते दहा दिवसांआड शहरवासियांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जास्तीत जास्त कालावधीपर्यंत पुरविण्याची कसरत मनपाला करावी लागत आहे. मात्र, दुसरीकडे नळाला पाणी सुटल्यानंतर काही नागरिक या पाण्याचा बेजबाबदारपणे वापर करीत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून पहावयास मिळत होते. स्वत:च्या घरातील पाणी भरणे झाल्यानंतर नागरिकांनी नळ बंद करुन ठेवणे अपेक्षित आहे. परंतु, नळाला पाणी येत असल्याने ते अंगणात, रस्त्यावर पाईपद्वारे शिंपडणे, शौचालयात किंवा नालीमध्ये नळ सोडून देणे, वाहने धुणे, बोअर-विहिरीमध्ये नळाचे पाणी सोडून देणे असे प्रकार होत असल्याचे मनपा प्रशासनाला आढळून आले. त्यामुळे अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नळधारकाविरुद्ध ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच घराचा बांधकाम परवाना रद्द करणे, नळजोडणी कायमस्वरुपी बंद करण्यासारखी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
पाण्याचा गैरवापर केल्यास लाखांचा दंड
By admin | Published: February 16, 2016 11:40 PM