सय्यद लाल
बाजारसावंगी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खुलताबाद कार्यालयाने येसगांव नंबर दोन ते बाजारसावंगी या चार किलोमीटर मुख्य रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाने तब्बल पस्तीस लाखांचा खर्च केला. परंतु या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण नव्हे घसरगुंडी बनविल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावरून आतापर्यंत ३६ दुचाकीधारकांचा अपघात झाला असून, यात तीन महिला व चार पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे किनगाव फाटा ते बाजारसावंगी या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर लाखो खड्डे पडले आहेत.
येसगाव नंबर दोन ते दवाखाना कॉलनी या तीन किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पस्तीस लाख रुपयांचा खर्च ठेकेदारामार्फत करण्यात आला. या रस्त्यावर खडी मुरुम टाकून दबाई करणे गरजेचे असताना ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी गौडबंगाल करून मातीमिश्रित मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचा सोपस्कार केला. हलका पाऊस होताच या मातीयुक्त घसरगुंडी रस्त्यावरून वाहने जाताना अपघातसत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे या मुख्य रस्त्यावरील घसरगुंडीवरून तब्बल ३६ दुचाकीधारकांचा अपघात झाला आहे. यात तीन महिला व चार पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे पैसा खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाने बनविलेली घसरगुंडी नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे.
-----
अधिकाऱ्यांचा कानाडोळा
येसगांव नंबर दोन ते दवाखाना काॅलनी या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या बनवाबनवीबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने ठेकेदाराने कामात हात साफ करून घेतला.
------
नागरिक करू लागले पर्याची रस्त्याचा वापर
किनगाव फाटा ते येसगाव नंबर दोन बाजारसावंगी ते दवाखाना कॉलनी, येसगाव नंबर दोन ते दवाखाना काॅलनी हा रस्ता वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनला आहे. त्यामुळे नागरिक येसगाव नंबर एक ते वढोद, सुलतानपूर या पर्यायी रस्त्याचा वापर करू लागले आहेत. दुसरीकडे चार दिवसांपासून किनगांव फाटा ते बाजारसावंगी या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंदच झाली आहे.
190821\1459-img-20210819-wa0041.jpg
येसगांव नंबर दोन ते बाजारसावंगी या रस्त्यावर पस्तीस लाख रुपये खर्चुन या मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने घसरगुंडी बनविली असल्याने चारचाकी व दुचाकी वाहने घसरुन अपघात होत आहे फोटो सय्यदलाल बाजारसावंगी