कोमल दशरथ आडसूळ (२०, रा. संतकृपा सोसायटी, बजाजनगर) यांनी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात नदीम राणा यांच्या सोबत भागीदारीत राणा मल्टिसर्व्हिसेस या नावाचे ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र सुरू केले होते. काही दिवसांपूर्वी कोमल आडसूळ या दुकानात असताना त्यांच्या ओळखीच्या अरुणा सातपुते व लीला वाघ यांनी त्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. या भांडणात दोघींनी दुकानातील टेबलवर ठेवलेले संगणक व प्रिंटर खाली पाडत दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून नुकसान केले. यानंतर दोघींनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख १ लाख २ हजार रुपये चोरून घटनास्थळावरून निघून गेल्या. याप्रकरणी कोमल आडसूळ यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या दोन महिलांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने कोमल आडसूळ यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. यानंतर अरुणा सातपुते व लीला वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगरात दुकानाची तोडफोड करून लाख रुपये पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:03 AM