औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत तब्बल १ लाख ४ हजार मतदार वाढले आहेत. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची एकूण संख्या २४ लाख ८८ हजार झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. तत्पूर्वी, जिल्ह्यात १ जून ते १७ सप्टेंबर या काळात दोन टप्प्यांत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर शनिवारी पुरवणी याद्यांसह अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात मतदारांची संख्या २३ लाख ८३ हजार ७५८ एवढी होती. त्यात आता एक लाख ४ हजार तीनशे मतदारांची भर पडली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाख ८८ हजार ३५२ झाली आहे. ८८२ जणांची नावे वगळलीलोकसभा निवडणुकीनंतर १ आॅगस्ट ते १७ सप्टेंबर या काळात मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा पार पडला. या काळात केवळ मतदारांचे अर्ज स्वीकारून त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले. आयोगाच्या सूचना असल्यामुळे यावेळी प्रशासनाने नाव वगळण्याबाबत स्वत:हून कारवाई केली नाही; पण तरीही जिल्ह्यात ८८२ जणांनी स्वत:हून वगळणी अर्ज दिला होता. त्यामुळे त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. दुसऱ्या ठिकाणी नाव असल्यामुळे किंवा स्थलांतरित झाल्यामुळे हे वगळणी अर्ज दिले होते, असे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात वाढले लाखभर मतदार
By admin | Published: September 30, 2014 1:17 AM