लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील ५४ वर्षीय सरस्वती आणि तिची २० वर्षीय मुलगी लक्ष्मी या हत्तींनी रविवारी सकाळी विशाखापट्टणम येथे जाण्यास नकार दिला. दोघींचे डोळे पाणावलेले होते. ज्या वाहनातून त्यांना न्यायचे होते त्या वाहनात त्या चढण्यास अजिबात तयार नव्हत्या. शेवटी क्रेनच्या साह्याने लक्ष्मीला वाहनात बसवावे लागले. त्यानंतर दोघींनी प्राणिसंग्रहालयाचा निरोप घेतला. वर्षानुवर्षे दोघींची सेवा करणाºया माहूत बांधवांनाही अश्रू अनावर झाले होते.केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सिद्धार्थ उद्यानातील हत्ती सरस्वती आणि लक्ष्मीला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. विशाखापट्टणम प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी डॉ. नवीनकुमार, केअरटेकर एम. के. रामकृष्णा शनिवारी औरंगाबादेत दाखल झाले. शनिवारी सायंकाळी अनेक तास परिश्रम घेतल्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मीने वाहनात चढण्यास नकार दिला. लक्ष्मीला तर गुंगीचे औषधही देण्यात आले होते. त्यानंतरही ती वाहनात चढली नाही.रविवारी सकाळी १० वाजेपासून दोघींना वाहनात चढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. डॉ. खाजा मोईनोद्दीन यांनी दोघींची तपासणी करून त्या प्रवास करण्यास सक्षम असल्याचे सांगितले. वाहनाच्या उंचीएवढा मातीचा भराव करण्यात आला होता. मात्र, दोघींच्या डोळ्यात अश्रुधारा सुरू होत्या. हे चित्र पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. दोन दिवसांपासून दोघींनी जेवणही सोडले होते.रविवारीही दोघींचा मूड खूपच खराब होता. आजच दोघींना कोणत्याही परिस्थितीत विशाखापट्टणम येथे रवाना करायचे होते. महापालिकेच्या अधिकाºयांनी सकाळी ११ वा. मोठ्या क्रेनची मदत घेतली. सरस्वतीने कोणतेही आढेवेढे न घेता वाहनात जाऊन बसणे पसंत केले. यानंतर थोड्या वेळाने लक्ष्मीला क्रेनचा बेल्ट बांधून वाहनात चढविण्याचा प्रयत्न केला. अथक परिश्रमानंतर ती वाहनात जाऊन बसली. दुपारी १.३० वाजता दोघींना विशाखापट्टणमकडे रवाना करण्यात आले.असा राहील प्रवासऔरंगाबाद ते विशाखापट्टणमचे अंतर १२०० कि.मी. आहे, ताशी ५० कि.मी. या वेगाने वाहन चालविण्यात येईल. नगर, सोलापूर मार्गे हैदराबाद येथे मुक्काम करण्यात येईल. सोमवारी विशाखापट्टणम येथे दोघींना नेण्यात येणार असल्याचे डॉ. नवीनकुमार यांनी सांगितले. दोघींना सुखरूप पोहोचविण्यासाठी सिद्धार्थ उद्यानातील माहूत रामदास चव्हाण, भागीनाथ म्हस्के यांनाही सोबत पाठविण्यात आले आहे.लक्ष्मीचा जन्म उद्यानातचमहापालिकेने १९९६ मध्ये कर्नाटकातून शंकर आणि सरस्वती ही हत्तीची जोडी प्राणिसंग्रहालयात आणली होती. त्यांच्यापासून १९९७ मध्ये लक्ष्मीने जन्म घेतला. १९९८ मध्ये शंकरचा अकाली मृत्यू झाला होता. तेव्हापासून सरस्वती एकटीच होती. तिनेच लक्ष्मीचा सांभाळ केला. आज सरस्वतीचे वय ५४ तर लक्ष्मीचे २० वर्षे आहे.अलीकडेच लक्ष्मीने प्राणिसंग्रहालयात एका माहुतावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर महापालिकेने देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांमध्ये एका नर हत्तीचा बराच शोध घेतला. मात्र, कोणीही नर हत्ती दिला नाही. त्यामुळे दोघींना दुसºया प्राणिसंग्रहालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील लक्ष्मी, सरस्वती पाणावलेल्या डोळ्यांनी रवाना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:10 AM