छत्रपती संभाजीनगर : ‘लाल परी’ म्हणजे एसटी बस आता खेड्यापाड्यांतही ‘गारेगार’ प्रवास घडविणार आहे. साधारण वर्षभरानंतर टप्प्याटप्प्यांत पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल होतील. आगामी महिनाभरात दीडशे इलेक्ट्रिक बस येतील. या इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असतील. ई-बस ग्रामीण भागातही धावतील. त्यामुळे ग्रामीण भागात एसी बससेवा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.
एसटी महामंडळाची मंगळवारी शहरात आढावा बैठक पार पडली. यावेळी चन्ने पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या संपाच्या कालावधीत बस जागेवर उभ्या राहिल्या, तेव्हा इंजिन, टायरसंदर्भात समस्या होत्या; परंतु त्यात दुरुस्ती करण्यात आली. ७०० नव्या डिझेल बसची ऑर्डर देण्यात आली. आणखी २ हजार डिझेल बस घेण्यात येतील. बैठकीस विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक प्रमोद जगताप यांच्यासह विविध जिल्ह्यांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
१५० मधील २० बस पुणे मार्गावर आगामी महिनाभरात दाखल होणाऱ्या १५० इलेक्ट्रिक बसमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला २० बस मिळतील. या बस छत्रपती संभाजीनगर- पुणे मार्गावर चालविण्यात येतील. पुणे, मुंबईसाठी शंभर बस दिल्या जातील, तर ५ हजार ई-बसमध्ये छत्रपती संभाजीनगरला १०६ बस मिळतील, असे चन्ने म्हणाले.
बॅटरीला आग लागण्याच्या घटनांमुळे खबरदारी१५० ई-बस यापूर्वीच दाखल होणार होत्या; परंतु मध्यंतरी ई-दुचाकींच्या बॅटरीला आग लागण्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर ई-बसच्या बॅटरीची तपासणी काटेकोरपणे केली गेली. त्यामुळे या बस रस्त्यावर येण्यास उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिला प्रवासी संख्येत ३० टक्के वाढराज्यात महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास ३० टक्क्यांनी महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे चन्ने यांनी सांगितले.
बस नाही म्हणून शाळा ‘बुडू’ नयेबससेवा नाही, म्हणून विद्यार्थी शाळेत जाणार नाही, असे कुठेही होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी शालेय बस वाहतुकीवरही लक्ष केंद्रित केल्याचे चन्ने म्हणाले.