औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील एक व्रतस्थ योद्धा म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल (९२) यांचे शनिवारी (दि. २८) रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा रविवारी (दि. २९) दुपारी २ वाजता त्यांच्या कुंभारवाडा येथील निवासस्थानाहून निघून कैलाशनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी वयाच्या १९ व्या वर्षी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी मुक्तिसंग्रामासह सामाजिक, शैक्षणिक, आध्यामिक, सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे कार्य केले. किराडपुरा येथील राममंदिराची निर्मिती, सीमंत अनाथ वसतिगृह, समर्थ व्यायामशाळा, सीमंत मंगल कार्यालय, बालाजी ट्रस्ट, गांधी स्मारक ट्रस्ट इत्यादी संस्था उभारणीचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद त्यांनी अनेक वर्षे भूषविले. ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीचे सचिव होते.माजी नगरसेवक चंद्रशेखर जैस्वाल, माजी नगरसेविका रेखा जैस्वाल, राजेंद्र जैस्वाल, विवेक जैस्वाल यांचे ते वडील, तर माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांचे काका होत.