: राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या हस्ते आॅनलाईन पुरस्कार वितरण
वाळूज उद्योगनगरीतील ‘टुल टेक टुलिंग’ कंपनीला ललित दोषी पुरस्कार
वाळूज महानगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे (एमआयडीसी) देण्यात येणारा ललित दोषी पुरस्कार वाळूज येथील ‘टुल टेक टुलिंग’ या कंपनीला जाहीर झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या हस्ते शुक्रवारी उद्योजक सुनील किर्दक यांना प्रदान करण्यात आला.
औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कंपनीला दरवर्षी एमआयडीसी प्रशासन व माजी सनदी अधिकारी ललित दोषी स्मृती फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी औरंगाबाद विभागातून वाळूज एमआयडीसीतील प्रसिध्द उद्योजक सुनील किर्दक यांच्या ‘टुल टेक दुलिंग’ या कंपनीला ललित दोषी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंपनीची पार्श्वभूमी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक कामगिरी, संशोधन आणि विक्री, व्यावसायिक सचोटी आदी विषयाच्या कडक निकषांतून कंपनीची पुरस्कारासाठी निवड केली जाते. या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत मराठवाड्यातील टुल टेक टुलिंग (वाळूज), मायक्रोनिक्स लिमिटेड (चिकलठाण), पुडवील प्लास्टिक (लातूर), पूजा रोटोमेक (जालना) व एअरटेक इंजिनीअर्स (शेंद्रा) या पाच कंपन्यांची निवड करण्यात आली होती. १ लाख रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जालना येथील पूजा रोटोमेक या कंपनीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात या पुरस्काराचे वितरण केले जाते. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘टुल टेक टुलिंग’ कंपनीचे सुनील किर्दक यांना पुरस्कार प्रदान केला.
टुल टेक टुलिंग कंपनीकडून विशेष यंदाची निर्मिती
वाळूज एमआयडीसीतील उद्योजक सुनील किर्दक हे टुल टेक टुलिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने विविध प्रकारच्या मशिनरी तयार केल्या जातात. यात वेल्डिंग, ऑटोमेशन, फिक्चर्स, कम्प्लिट मफलर असेम्बली मॅन्युफॅक्चरिंग लाइन, प्रोसेस ऑटोमेशन आदी क्षेत्रात मशिनरी वापरल्या जातात. या कंपनीत १०० जणांना रोजगार मिळाला असून या कंपनीची वार्षिक उलाढाल १२.५० कोटीची असून सन २०२२ मध्ये या कंपनीची उलाढाल २०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. टुल टेक टुलिंग कंपनीला यापूर्वीही दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून प्रतिष्ठित ललित दोषी पुरस्कार जाहीर झाल्याने जबाबदारी वाढल्याचे उद्योजक सुनील किर्दक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
फोटो क्रमांक- सुनील किर्दक (व्यवस्थापकीय संचालक)
--------------------------