प्रवासी संख्या वाढली : ठरलेल्या वेळेत जाण्याची तयारी
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : कोरोना काळात प्रवाशांची गैरसोय झाली. अनलॉकनंतर प्रवासी संख्या वाढली असली तरी स्थानकात बसगाड्या बेशिस्त थांबविल्या जात आहेत. त्याचा मनस्ताप प्रवाशांना होत आहे.
ठराविक फलाटावर बसगाडी थांबत असते. त्यामुळे प्रवाशांना तिथे वेळेत पोहोचवून जागा धरावी लागत असते. स्थानकात प्रवासी बसगाडीचा शोध घेत असताना मध्येच दुसऱ्या बसगाड्या येतात. त्यामुळे अपघातात सारखे प्रसंग ओढवले जातात. सोबत लहान मुले व कुटुंबातील व्यक्ती असल्यास जास्त खबरदारी घ्यावी लागते. बसस्थानकातून बाहेर जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रवाशांना मात्र अतिदक्षता बाळगत बसगाडी शोधावी लागते. स्थानकात बेशिस्तीने थांबलेल्या बसगाड्यांमुळे मोठा अनर्थ होऊ शकतो.
प्रवाशांची प्रतिक्रिया....
रस्त्यात अडथळा धोकादायक
अनेक कामगार गावाकडून शहरात येत आहेत, तर कामानिमित्त गावाकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या वाढली आहे. बसस्थानकात गावाकडे जाणाऱ्या बसगाडीचा शोध घ्यावा लागतो. रस्त्यातच उभ्या असलेल्या बसमुळे अपघाताची भीती आहे.
- संतोष शेंगुळे (प्रवासी)
ज्येष्ठांना त्रास होतो
ज्येष्ठ नागरिकांना बस पकडण्यासाठी जाताना स्थानकात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यामुळे अपघातास सामोरे जावे लागते. बसस्थानकात येणे आणि जाणे, असे दोन प्रवेशद्वार असतानाही बसच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रवासी मिळविण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालक अडथळा निर्माण करतात.
- बाबू पवार (प्रवासी)
माइकवरून सांगितले जाते
आगाराच्या परिसरात बसची गर्दी वाढल्यामुळे प्रवाशांची अनेकदा गैरसोय होते. त्यासाठी माइकवरून सूचना केल्या जातात. प्रवासी संख्या जास्त असल्यास कधी चुकून वेडीवाकडी बसगाडी उभी केल्यास चालकाला सुनावण्यात येते.
-आगार प्रमुख, एसटी महामंडळ
फोटो कॅप्शन.... एसटी स्थानकात अशा गैरसोयीने लावण्यात आलेल्या बस व प्रवाशांची बस शोधण्यासाठी धावपळ.