छत्रपती संभाजीनगर: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या साथीदारांमार्फत आमच्या जमिनी बेकायदशीररित्या घेऊन आम्हाला बेघर, भूमीहिन केल्याचा आरोप करीत सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी क्रांतीचौकात निदर्शने केली. यावेळी आंदोलक शेतकरीअब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणा देत होते. शिवाय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमी चर्चेतील आणि वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यावर बेकायदेशीर जमीन हाडपल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करीत शहरातील क्रांतीचौकात निदर्शने केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. सत्तार यांनी बाजारभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून जमिनी घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला.
या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी कमलेश कटारिया, सुनील मिरकर, महेश शंकरपेल्ली, गजानन अप्पाराव गोराडे, आशाबाई धोंडू बोराडे, तय्यब बडे मियाखां पठाण, मुक्तार सतार बागवान, शकील साहेबखां पठाण, कृष्णा कडूबा कापसे, संजय माणिकराव निकम, भगवान सुखदेव जीवरग, सुनील प्रभाकर मिरकर, मनोज गंगाराम मोरेल्लु, कमलेश गोविंदराम कटारिया, विष्णू गंगाराम काटकर आदींसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.