औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अमेरिकन कॉन्सिलेट जनरल यांच्यात शिक्षण, संशोधन व सांस्कृतिक अदानप्रदान करण्याचा मानस अमेरिकन कॉन्सिलेट जनरलच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला. विद्यापीठाचे अमेरिकेत केंद्र सुरू करण्याबाबत तसेच विविध कराराबाबतही यावेळी प्राथमिक चर्चा झाली.
मुंबई येथील अमेरिकन राजदुतावासाचे कॉन्सिलेट जनरल डेव्हिड जे. रांझ यांनी गुरुवारी विद्यापीठास भेट दिली. सुमारे दीड तासांच्या या भेटीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. प्रारंभी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्यासमवेत या शिष्टमंडळाने संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्य अधिकारी युन नाम व वरिष्ठ सांस्कृतिक कार्य सल्लागार तसनिम कळसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात झालेल्या बैठकीत प्र-कुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी या शिष्टमंडळाला कुलगुरू डॉ. येवले यांनी विद्यापीठातील सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स, बजाज इन्क्युबूशन सेंटर, व्होकेशनल स्टडीज आदींचे कार्य, अध्यापन, संशोधन व विकास कार्याबद्दल माहिती दिली. याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणात राज्य अथवा केंद्रीय विद्यापीठांना विदेशात संशोधन केंद्र स्थापन करता येणार आहेत. मराठवाड्याचा सांस्कृतिक वारसा भव्य असून अजिंठा, वेरूळसह विविध हेरिटेज व संशोधन प्रकल्पासाठी अमेरिकन केंद्र सुरू करण्याबद्दलही प्रस्ताव आहे, असे कुलगुरुंनी सांगितले.
त्यानंतर कॉन्सिलेट जनरल डेव्हिड जे. रांझ म्हणाले की, या विद्यापीठात ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. संशोधन शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या विद्यापीठासमवेत शैक्षणिक अदानप्रदान करण्यास निश्चितच आनंद होईल.
यावेळी रसायन तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते, बजाज इन्क्युबूशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन देशमुख व आंतरराष्ट्रीय केंद्राच्या संचालक डॉ. वंदना हिवराळे यांनी आपल्या केंद्रांमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. भगवान साखळे, डॉ. गणेश मंझा आदींचीही उपस्थिती होती.