औरंगाबाद : उद्योग, जमीन, कामगार, पाणी, वीज येथील वापरतात आणि कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत देण्यात येणारी मदत दुसरीकडे देतात. सीएसआरचा निधी येथेच दिला तर या शहरातील पर्यटन, ऐतिहासिक दरवाजांसह इतर विकासाची कामे वेगाने होतील. उद्योगांनी सीएसआर येथेच द्यावा, असे आवाहन खा.इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी केले.
सीएमआयएतर्फे खा.जलील यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष गिरीधर संगनेरिया, सचिव शिवप्रसाद जाजू, कमलेश धूत, माजी अध्यक्ष राम भोगले, गुरूप्रीतसिंग बग्गा, मुकुंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
खा.जलील म्हणाले, सीएमआयएने निमंत्रित केल्यामुळे धक्काच बसला. मी मुस्लिम नव्हे तर औरंगाबादचा खासदार आहे. येथे निमंत्रित केल्यामुळे आनंदच होतो आहे. उद्योग, पर्यटन, दळणवळणासाठी चांगले काम करण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागेल. शहराची प्रतिमा संवेदनशील आहे. ती प्रतिमा आपल्याला सर्वांना मिळून बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. औरंगाबादच्या विकासासाठी पर्यटन महत्त्वाचे आहे. कुठे न कुठे काही चुका आहेत. त्या सुधाराव्या लागतील.उदयपूर, हैदराबाद विमानसेवेचा फायदा निश्चित होईल. तसेच इतर विमानसेवेसाठीदेखील आपले प्रयत्न सुरूच राहतील. या संदर्भात थेट केंद्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सव घ्यावे लागतील. दुष्काळासारखी कारणे अधिकाऱ्यांनी पुढे करून महोत्सव घेणे बंद करू नये. पुण्यात काही झाले तरी महोत्सव घेतला जातो. या संवाद कार्यक्रमात व्यापारी महासंघ, उद्योजकांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संगनेरिया यांनी केले. सचिव जाजू यांनी खा.जलील यांचा परिचय करून दिला. तर माजी अध्यक्ष भोगले यांनी अध्यक्षीय समारोपात उद्योगांसमोरील आव्हाने विशद केली.
कदम आणि खैरे यांच्यातील फरक सांगितलाखा.जलील यांनी माजी खा.चंद्रकांत खैरे आणि माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्या कार्यशैलीचा एक किस्सा यावेळी सांगितला. ऐतिहासिक दरवाजांच्या दुरुस्तीसाठी डीपीडीसीमध्ये मुद्दा मांडला असता माजी खा.खैरे म्हणाले, केंद्राकडे १०० कोटींचा निधी मागितला आहे. यावर मग कदम यांना बोललो. त्यांनी तातडीने एका दरवाजाच्या संवर्धनासाठी डीपीडीसीतून ३ कोटी दिले. कदम यांचा कटकटगेट परिसरात जंगी सत्कार केला. तो सत्कार पाहून कदम म्हणाले, असा सत्कार मी आजवर पाहिला नाही. मग मी म्हणालो, पाणचक्कीच्या संवर्धनासाठी निधी द्या, यापेक्षा मोठा सत्कार करतो. अशी काही उदाहरणे खा.जलील यांनी संवादाप्रसंगी दिली.