औरंगाबाद : गावच्या सरपंच पदापासून ते थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशी देदीप्यमान वाटचाल करणारे विलासराव देशमुख करिश्मा असलेले दृष्टे नेते होते. 'मास लीडर आणि क्लास लीडर' अशा दोन्ही गुणांचा संगम त्यांच्यात होता. एखादा नेता कशा पद्धतीने जातीधर्माच्या पलीकडे सर्वसमावेशक राजकारण करू शकतो, याचं उत्तम उदाहरण विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले, असे प्रतिपादन माजी कुलगुरू, ज्येष्ठ विचारवंत डॉ सुधीर गव्हाणे यांनी केले. तसेच विलासराव देशमुख यांचा औरंगाबादच्या विकासातील योगदान सांगताना शहरातील एक मोक्याचा भूखंड बिल्डरच्या तावडीतून काढून तत्काळ निर्णय घेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने भव्य विभागीय क्रीडांगण उभारले याचा किस्सा सुद्धा यावेळी डॉ. गव्हाणे यांनी सांगितला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख जयंतीनिमित्त बुधवारी (दि.२६) ऑनलाईन व्याख्यान झाले. विद्यापीठात विलासराव देशमुख अध्यासन केंद्राच्यावतीने हा कार्यक्रम झाला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले आहेत. या कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, संचालक डॉ.रामराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रख्यात विचारवंत डॉ. सुधीर गव्हाणे (माजी कुलगुरु, एमजीएम विद्यापीठ) यांचे ‘विलासराव देशमुख : एक दृष्टे नेते‘ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. गव्हाणे यांनी यावेळी विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणी आणि धडाडीच्या निर्णयांना उजाळा दिला.
डॉ. गव्हाणे म्हणाले, गावच्या सरपंच पदापासून ते थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशी देदीप्यमान वाटचाल करणारे विलासराव करिश्मा असलेले दृष्टे नेते होते. 'मास लीडर आणि क्लास लीडर' अशा दोन्ही गुणांचा संगम त्यांच्यात होता. १९ शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत अगदी अलीकडच्या काळातही महाराष्ट्राने उच्च गुणवत्तेचे नेतृत्व देशाला दिले आहे. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण या नेत्यांचा समर्थ वारसा विलासराव देशमुख यांनी पुढे नेला. विलासराव देशमुख हे दहा वर्षांत दोनदा मुख्यमंत्री होते, असामान्य तेजस्वी वक्ते, आश्चर्यकारक लोकनेते, विकास स्वप्नदर्शी, ग्रामपंचायतीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती ते मुख्यमंत्री व पुढे केंद्रीय पातळीवर ते गेले. घरात कोणती पार्श्वभूमी नसताना त्यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद आहे. ग्रामीण भारतातील वास्तविक सत्यता आणि शेतकरी तसेच गरिबांच्या समस्या सोडवण्याची क्षमता असणारे खरे तळागाळातील नेते होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि मुख्यमंत्रिपदी म्हणून त्यांनी केलेली कामगिरी विकासकेंद्री होती आणि सामाजिक न्यायाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांचे योगदान होते. विलासराव, गोपीनाय मुंडे यांच्या तोडीचे नेते मराठवाड्यात आता उरले नाहीत. त्यांच्या अकाली जाण्यामुळे आपले मोठे नुकसान झाले, असेही डॉ. गव्हाणे म्हणाले.
बिल्डरच्या घशात जाणारा भूखंड क्रीडासंकुलासऔरंगाबादमध्ये बंद पडलेल्या सुतगिरणीची जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला होता. तथापि माजी खासदार मोरेश्वर सावे यांनी ही बाब मंत्रालयात जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. विलासराव यांनी तत्काळ निर्णय घेत त्यावर स्टे दिला. ऐवढेच नाही तर ती जागा विभागीय क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून दिली. आज या ठिकाणी मराठवाड्यातील सर्वात मोठे व अत्याधुनिक असे क्रीडा संकुल तेथे उभे आहे. सिडको नाट्यगृह ही त्यांच्यामुळेच साकारले गेले. दरवर्षी औरंगाबादेत मंत्रिमंडळ बैठक, विद्यापीठासाठी भरीव निधी अशा अनेक माध्यमातून त्यांनी मराठवाड्याच्या विकासात भरीव योगदान दिले. याशिवाय औरंगाबाद शहरावर विलासराव देशमुख यांचे विशेष प्रेम होते, याचे अनेक दाखले यावेळी डॉ.सुधीर गव्हाणे यांनी दिले.
विद्यापीठातील विलासराव देशमुख स्टुडिओचे लवकरच लोकार्पण : कुलगुरूडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मा. विलासराव देशमुख यांच्या नावाने अद्ययावत डिजिटल स्टुडिओ उभारण्यात आला असून त्याचे लवकरच समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात येईल, असे अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी घोषित केले. विलासराव देशमुख यांना २०१० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डिलिट देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता केली आहे, असेही कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले. अध्यासनातर्फे लवकरच विलासरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा ग्रंथ व त्यांच्या भाषणाचा संग्रह असणारे पुस्तक साकारणार आहे, अशी माहिती प्रस्ताविकात डॉ. राम चव्हाण यांनी दिली. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. हणमंत सोनकांबळे यांनी आभार मानले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ.फुलचंद सलामपुरे,अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे , अधिसभा सदस्य डॉ.जितेंद्र देहाडे ,डॉ.सतीश दांडगे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आदींनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला.