पैठण : जलकुभांच्या उभारणीसाठी जुन्या तहसील कार्यालयाची जागा ताब्यात घेण्यासाठी १५व्या वित्त आयोगातून भोगवाटा मूल्य भरण्याचा ठराव गुरुवारी नगर परिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला. येत्या दोन दिवसात रक्कम भरण्याची कार्यवाही होणार असल्याचे नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी स्पष्ट केले.
पैठण शहरातील नेहरू चौक भागात जलकुंभ बांधण्यासाठी लागणारी जागा हस्तांतरणासाठी नगर परिषदेने जमिनीचे भोगवाटा मूल्य ८ लाख ६८ हजार शासनाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. दोन वर्षांपासून जागेअभावी रखडलेल्या जलकुभांच्या कामासाठी जमिनीचे मूल्य नगर परिषद प्रशासन कधी भरते, याकडेही जनतेचे लक्ष लागले होते. या तातडीच्या विषयावर निर्णयासाठी नगराध्यक्ष लोळगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ऑनलाईन विशेष सभा झाली. व्हर्च्युअल झालेल्या सभेत मुख्याधिकारी व नगरसेवकांनी ऑनलाईन भाग घेतला. महसूल विभागाची जागा नगर परिषदेकडे हस्तांतरणासाठी लागणारी रक्कम पंधराव्या वित्त आयोगातून भरण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
--- जलकुंभाचा प्रश्न निकाली -----
पैठण शहरातील लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून जलकुभांच्या बांधकामास दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. मात्र, अस्तित्त्वात असलेल्या जलकुभांची जागा नवीन जलकुंभ बांधण्यास कमी पडत असल्याने काम रखडले होते. दुसरीकडे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने रोष निर्माण झाला होता. पण जलकुंभाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.