छत्रपती संभाजीनगर : देवळाई शिवारातील गट नंबर ८३ मधील पाच जणांची सामायिक कोट्यावधी रुपयांची २५ गुंठे जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आठ जणांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये अशोक पुंडलिकराव शहाणे, कचरुलाल रामचंद्र बांगड, सुभाष रामचंद्र बांगड, विनोद शिवलिंग आप्पा फसके, सुजीत मदनलाल कासलीवाल, रेखा मदनलाल कासलीवाल, प्रकाश विठ्ठलराव चोले आणि अनिता प्रकाश चोले यांचा समावेश आहे. शितल गंगवाल, प्रविण देशमुख आणि संतोष जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांसह विनोद फसके व नंदादेवी भक्कड यांनी देवळाई शिवारातील गट नंबर ८३ मध्ये २५ गुंठे जमीन जून २००१ मध्ये अनीस खॉ महमूद खॉ पठाण यांच्याकडून खरेदी केली.
त्यात फिर्यादी तिघांची १३ गुंठे आणि विनोद फसके ६ व नंदादेवी बक्कड यांची ६ गुंठे जमिन आहे. ही सर्व जमिन अविभक्त व सामायिक आहे. डिसेंबर २०२२ मध्ये या जमिनीवर त्यांच्या नावाचा बोर्ड काढून रेखा मदनलाल कासलीवाल यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला. तेव्हा त्यांना विचारपुस केली असता, त्यांनी फुलंब्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री केल्याचे सांगितले. त्या रजिस्ट्रीनुसार त्यांनी ६१ गुंठे जमीन इम्तियाज खान सरदार खान यांच्याकडून विकत घेतली आहे.
परंतु मुळ मालकी फक्त ६१ गुंठे असताना त सुभाष बांगड, कचरुलाल बांगड व अशोक शहाणे यांनी ८६ गुंठे जमिनीचे बनावट लेआऊट बनवून घेत तत्कालीन ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंचास हाताशी धरून अवैध लेआऊट मंजुर करून घेतले. त्यावेळी कोणतेही कागदपत्रे नसताना फिर्यादींच्या मालकीची २५ गुंठे जमीन लेआऊटमध्ये बेकायेदशीर रित्या समाविष्ठ केली. तसेच भुमीअभिलेखच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीची मोजणीही करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार आठ जणांच्या विरोधात चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास उपनिरीक्षक रविकिरण दरवडे करीत आहेत.