छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कारणावरून घरमालकाने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला केल्याची घटना एन ९, पवननगर, सिडको भागात बुधवारी रात्री घडली. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दिली.
निवृत्ती कडूबा कावळे (१७), प्रमोद पंढरीनाथ गायकवाड (१७, दोघे रा. वाघोळा, ता. फुलंब्री) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. किरकोळ जखमींमध्ये रवी जग्गनाथ गायकवाड, अभिषेक गोकुळदास गायकवाड यांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या घरमालकाचे लक्ष्मीकांत नारायण अंहकारी, नारायण दत्तोपंत अंहकारी (रा. पवननगर) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील चार विद्यार्थ्यांनी डबल रूम भाड्याने घेतली होती. हे चौघेही टी.व्ही. सेंटर परिसरातील एका अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करीत होते. बुधवारी रात्री प्रमोद व निवृत्ती हे दोघेजण किचनमध्ये स्वायंपाक करीत होते. तर इतर दोघे हॉलमध्ये अभ्यासाला बसले होते. तेव्हा घरामालकाचा मुलगा लक्ष्मीकांत अंहकारी हा तिथे आला. त्याने किचनचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. तेव्हा विद्यार्थ्यांनी स्वयंपाक झाल्यानंतर दरवाजा बंद करतो असे सांगितले. त्यावर रागावलेल्या लक्ष्मीकांतने शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांवर चाकू हल्ला केला.
लक्ष्मीकांतच्या मदतीला त्याचा वडिलही आला. दोघांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यात निवृत्ती व प्रमोदच्या गाल, मान आणि हातावर चाकूने वार केले. ही आरडाओरड ऐकल्यानंतर समोरच्या रुममधील मित्र किचनमध्ये आले. तेव्हा निवृत्ती व प्रमोद रक्तबंबाळ झाले होते. किचनमध्ये सर्वत्र रक्त सांडले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या मित्रांनी दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांची प्रकृती ठिक असून, त्यांना मोठ्या प्रमाणात टाके घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
विद्यार्थ्यांचे पैसे लांबविले
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी नुकतेच गावाकडे जाऊन आले होते. त्यांनी ॲकॅडमीचे शुल्क भरण्यासाठी पालकांकडून पैसे आणले होते. हल्लेखोर घरमालकांनी हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पैसे लंपास केल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला आहे.