औरंगाबाद : कडक उन्हाळा, लग्नसराई आणि निवडणुकीच्या धामधुमीमुळे दीड महिन्यापासून रक्तदानाचे प्रमाण घटले असताना त्याची मागणी मात्र कायम आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठी शासकीय रक्तपेढी घाटी रुग्णालयात आहे. तेथे हजार ते बाराशे रुग्ण वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये दाखल असतात. विशेषत: सिझेरियन आणि गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी मराठवाड्याच्या कानाकोपर्यांतून महिला घाटी रुग्णालयात दाखल होतात. सिझेरियन प्रसूतीदरम्यान रुग्णास रक्त द्यावेच लागते. शस्त्रक्रिया सुरू असतानाही बर्याचदा रुग्णांना रक्त द्यावे लागते. रक्तक्षय रोगी, घात-अपघातातील गंभीर जखमींना, सर्पदंश झालेल्यांना रक्ताची नितांत गरज असते. रोज सरासरी ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी रक्तपेढीकडे येते, अशी माहिती शासकीय रक्तपेढीतील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पी.एम. जठार यांनी दिली. डॉ. जठार म्हणाले की, शाळा, महाविद्यालयांना सध्या सुट्या असल्यामुळे रक्तदान करणार्यांची संख्या घटली आहे. संयोजक उन्हाळ्यात रक्तदान शिबीर घेण्याचे टाळतात. मे महिन्यात आतापर्यंत सहा शिबिरे झाली आहेत. शिबिरांची संख्या घटली असली तरी मागणी मात्र कायम वाढतच असल्यामुळे रुग्णांना रक्त कोठून द्यावे, असा प्रश्न आहे. सध्या केवळ चार दिवस पुरेल एवढेच रक्त आहे, असे डॉ. जठार म्हणाले. बी पॉझिटिव्ह ग्रुपचे रक्त शिल्लक नसल्याचे ते म्हणाले. रुग्णांच्या सोयीसाठी नागरिकांनी घाटीत येऊन उत्स्फू र्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. अमृता रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शामराव सोनवणे म्हणाले की, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. रक्ताची मागणी मात्र कायम असल्याने सध्या विविध ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा आहे. रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. दत्ताजी भाले रक्तपेढीचे संचालक डॉ. महेंद्रसिंह चौहान म्हणाले की, रोज सरासरी १०० रुग्णांना रक्तपेशींचा पुरवठा करावा लागतो. आमच्या रक्तपेढीत रक्त आहे. मात्र, प्रत्येकाने नियमित रक्तदान करायला हवे. रक्तदानामुळे रुग्णाचे प्राण वाचतात. त्यामुळे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित गरज थॅलेसेमियाच्या रुग्णांना दोन ते तीन आठवड्यांतून एकदा रक्त द्यावे लागते. त्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. घाटीत दरमहा सुमारे १५० ते २०० थॅलेसेमियाचे रुग्ण दाखल होतात. त्यांना रक्तपुरवठा केला जातो. शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये थॅलेसेमियाचे रुग्ण रक्ताची मागणी नोंदवितात. त्यांना मोफत आणि वेळेवर रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित रक्तपेढीची असते.
विविध पेढ्यांमध्ये मोठी रक्तटंचाई
By admin | Published: May 19, 2014 1:21 AM