औरंगाबाद : मराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करून शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्यास प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनालाही सहभागी करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यात सुमारे १ कोटी रुपयांचा बोगस खतांचा अवैध साठा पकडण्यात आला. या कारवाईमुळे अनेक खतांच्या कंपन्यांना कुलूप लागले असून, मालक मराठवाडा सोडून पसार झाले आहेत. खतांचा अवैध साठा, तसेच बनावट खत उत्पादन व विक्रीत मोठ्या महाभागांचा सहभाग आहे. विभागीय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित खत कंपनीमालकांवरच थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बोगस खत प्रकरणात अहवाल आल्यानंतर एकेकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खतांमध्ये राख मिसळली जात आहे. लॅबमध्ये नमुने तपासणीसाठी पाठविले, तर लॅबही मॅनेज करण्याचा प्रकार केला जात आहे. नांदेडमध्ये खत उत्पादक कंपनीचे मालक हे राजकारणाशी निगडित आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल होण्यातच अडथळे येत आहेत. खतांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने आजवर १५ ते १७ कंपन्या बंद केल्या असून, सदरील खत उत्पादक पळून गेले आहेत.
जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत बोगस खतविक्री प्रकरणात कारवाया करण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूरपाठोपाठ फुलंब्री, कन्नड आणि शेंद्रा येथे कारवाई करण्यात आली. गुजरात येथून माल भरून आणल्यानंतर स्थानिक पातळीवर प्लास्टिक बकेटमध्ये रॅपरिंग करून खतविक्री करण्याचा धंदा चव्हाट्यावर आला. खतांच्या बॅगांवर खतातील मूळ व खऱ्या घटकांचा उल्लेखही केला जात नाही. अन्नद्रव्यांचा वाटेल तितक्या प्रमाणात उल्लेख करून शेतकऱ्यांना तो माल विक्री केला जात होता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष घालून कारवाईचे आदेश विभागीय प्रशासनाने दिले आहेत.