लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनियमित पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, आता अपेक्षा रबीकडून व्यक्त होत आहे; पण यासाठीही चांगल्या पावसाची गरज राहणारच आहे.जून २०१७ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. जुलै २०१७ च्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. १४ जुलै २०१७ नंतर झालेल्या पर्जन्यमानामुळे पीक परिस्थितीत सुधारणा झाली होती. २२ जुलै २०१७ ते १८ आॅगस्ट २०१७ या कालावधीत पावसाचा खंड, त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम झाला. १९ आॅगस्टनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती सुधारत आहे.मका पिकाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे उत्पादनात २० ते २२ टक्के घट अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, सोयगाव तालुक्यात पावसाच्या खंडामुळे ४० ते ५० टक्के उत्पादनात घट अपेक्षित आहे. सध्या मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.बाजरी पीकही दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे औरंगाबाद जिल्ह्यात २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. बीड जिल्ह्यातही बाजरीचे उत्पादन घटणार आहे. खरिपाची ज्वारी १९ आॅगस्ट २०१७ नंतर झालेल्या पावसामुळे सुधारत आहे. ज्वारी आता दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या व फांद्या फुटण्याच्या अवस्थेत असून १९ आॅगस्टनंतरच्या पावसामुळे तूर पिकाची परिस्थिती सुधारत आहे. जालना जिल्ह्यात तुरीचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त राहील.मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट येणार आहे. सध्या मूग पीक काढणीच्या व मळणीच्या अवस्थेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड वगळता उत्पादनात ४० ते ५० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात १२२६ हेक्टर क्षेत्रातील मूग मोडावे लागले आहे. बीड जिल्ह्यात मूग पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे, अशीच गत उडीद पिकाची आहे. बीड जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत घट येण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यात ३९ हेक्टर क्षेत्रातील उडीद मोडावे लागले आहे. सिल्लोड वगळता औरंगाबाद जिल्ह्यात उत्पादनामध्ये ४० ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. कापूस पिकाचेही उत्पादन घटणार आहे. पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. कापसाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात १५ ते २० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात २२०० हेक्टर क्षेत्रातील कापूस मोडावा लागला होता. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.
खरिपाच्या उत्पादनात मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:56 AM