औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान दहा हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तीन महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. त्यानंतरही महापालिका प्रशासन अद्याप ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. शहरात लवकरच साथरोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात दररोज ३५० ते ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पूर्वी हा कचरा वर्गीकरण न करता नारेगाव येथील कचरा डेपोत नेऊन टाकण्यात येत होता. १६ फेब्रुवारीपासून नारेगावचा रस्ताही मनपासाठी बंद झाला आहे. मागील तीन महिन्यांत महापालिकेला कचरा प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. ३० एप्रिल रोजी शहरातील किमान २ हजार मेट्रिक टन कचरा चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी भागात नेऊन टाकण्यात आला. त्यानंतर महापालिकेने कचराच उचलला नाही. मागील एक महिन्यापासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये कचरा पडून आहे. शहराच्या चारही भागांत कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचा देखावा मनपातर्फे करण्यात आला. प्रत्यक्षात कोणतीच प्रक्रिया मनपाने केलेली नाही. ज्या भागात कचरा टाकण्यात आला तेथे कचरा आजही सडत आहे.
महापालिकेने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करून शहरात ३५० पेक्षा अधिक कंपोस्ट पीट तयार केले. या पीटचा वापर काही प्रमाणात मनपाने केला. हा प्रयोग फसल्याचे लवकरच मनपाच्या लक्षात आले. कंपोस्ट पीटमधील कचऱ्यावर प्रक्रिया होण्यासाठी किमान २१ दिवस लागतात. या पीटमध्ये कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर आता मनपा पदाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाची या प्रकरणात चांगलीच कोंडी झाली आहे.