शेतकरी हवालदिल : पाण्याअभावी फळबागा गेल्या वाळून; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षाशिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून जोपासलेल्या फळबागांना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे. शेवटच्या घटका मोजत असलेल्या बागांची अवस्था पाहून शेतकरी अत्यवस्थ झाला आहे. रोपांपासून जगवलेली फळझाडे उघड्या डोळ्यांनी मरणासन्न होत असल्याचे विदारक चित्र दुष्काळाने निर्माण केले आहे.उसाकडून कापसाकडे वळण घेतलेल्या शेतकऱ्याने दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि पैसा देणाऱ्या फळबागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. त्याला तितकाच जीव लावून रोपांचे भरणपोषण केले. पाणी मिळाले तर फळांचा बहर धरता आला असता; मात्र हे सारे दुष्काळाच्या आगीत होरपळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले.सुरुवातीलाच पावसाने त्याची चाल दाखविल्याने पाणी कमी पडणार, याची जाणीव करून दिलेली असल्याने आहे ते पाणी किमान फळबागा जगविण्यासाठी जपून वापरले पाहिजे, त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला गेला; मात्र विहिरीच कोरड्याठाक पडल्याने काही शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता टँकरचे पाणी देऊन झाडांना जोपासण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी उष्णतेचा तडाखा तीव्र असल्याने दोन तासांत पाणी देऊन भिजवलेली जागा वाळून जात असल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले.डाळिंब पीक फुलाला आले होते; मात्र फळधारणाची अपेक्षा ठेवल्यास झाडच वाळून जातील म्हणून फळाचा बहार धरलाच नाही. आता तर मे महिना, हा खरा परीक्षेचा कालावधी आहे. पहिल्याच दिवशी ‘मे’ने करामत दाखवली. उन्हात बागा जगतील, याची शाश्वती राहिली नाही.सर्वतोपरी बागा जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र आता पिण्यालाच पाणी नाही, तर चिकूच्या झाडांना काय घालणार? पाणीच नसल्याने दुष्काळी वणवा पाहावत नसल्याची खंत मल्हारी आघाव यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)फळबागांचे क्षेत्र ६१० वरून आले ३४५ वरतालुक्यात ६१० हेक्टर एवढे क्षेत्र फळबागांचे होते; मात्र सलग तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या अवर्षणाने ते घटत घटत आजमितीला निम्यावर म्हणजे ३४५ हेक्टरवर आले. यात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र १६५ हेक्टर असून, दीर्घकालीन चिंच ३२ हेक्टर, चिकू २३ हेक्टर, आंबा ७० हेक्टर, मोसंबी पाच हेक्टरवर, शिवाय उर्वरित क्षेत्रावर सीताफळ, कागदी लिंबू असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.
फळबागा मोजताहेत शेवटच्या घटका
By admin | Published: May 04, 2016 12:02 AM