औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील एक तरी गाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गावे अशी महाकवी वामनदादा कर्डक यांची आंतरिक इच्छा होती. त्यातूनच वामनदादा आणि मी लतादीदींना भेटण्यासाठी गेलो. त्यांनी जेवण दिले. मात्र, गाणे काही गायले नाही. प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनीही प्रयत्न केले, तरीही गाणे काही गायले नाही. तेव्हा वामनदादांनी ‘तुम्ही दगडांचीच गाणी गा, माणसाची गाणी नका गाऊ’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची आठवण प्रसिद्ध कवी डॉ. रविचंद्र हडसणकर यांनी सांगितली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रातर्फे वामनदादांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन महात्मा फुले सभागृहात मंगळवारी केले होते. प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. राहुल म्हस्के, साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, संचालक डॉ. युवराज धबडगे उपस्थित होते.
‘वामनदादा कर्डक : व्यक्ती आणि कार्य’ या विषयावर बोलताना डॉ. हडसणकर म्हणाले, संस्कृतीच्या ठेकेदारांनी अनेक वर्षे दीन, दलित, वंचितांचे जीवन गीत-संगीत रागदरबारातून दूरच ठेवले होते. अशा काळात वंचित समाजाचे दु:ख प्रभावीपणे मांडून वामनदादा कर्डक हे खऱ्या अर्थाने महाकवी ठरले. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक जण उभे राहिले. लेखन, गायन व लढ्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार अनेकांनी समर्थपणे पुढे नेला. हाच विचार घेऊन वामनदादांनी गीते, कविता लिहिल्या. प्रस्थापित लेखक, कलावंत मंडळी उपेक्षितांचे दु:ख मांडण्याचे टाळत होती. तेव्हा वामनदादांनी ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ या शब्दात वंचितांच्या जीवनात प्रकाशाची पेरणी केली. बाबासाहेबांचा लढा हा त्यांच्या गाणी, कवितांच्या माध्यमातून मांडला. त्यांनी शेती, कष्टकरी, महिला यांच्यावरील गाण्यासोबतच प्रेम, विरहाचीही गीते लिहिली. ‘सांगा या वेडीला, गुलछडीला’, ‘करिते पूजा मी गौतमाची’, ‘नदीच्या पलाड बाई झाडी लई दाट-तिथूनच जाते माझे माहेराची वाट’, अशी अनेक अजरामर गाणी लिहिली, असल्याचेही डॉ. हडसणकर यांनी सांगितले. यावेळी प्रा. राहुल म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी केला. संचालक डॉ. धबडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वि.दा. मस्के यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बाबासाहेब गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमात मोतीराज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.