लासूर स्टेशन : ‘लेट लतीफ शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान’ या मथळ्याखाली लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करतात त्याची दखल थेट शिक्षणाधिकाऱ्यांनी घेत गटशिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.विद्यार्थ्यांना तीव्र पाणीटंचाई उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेने शाळेची वेळ निम्म्यावर सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा वाजताची केली होती, मात्र विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचा फायदा शिक्षकच उचलत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात काही शाळांची माहिती घेतली असता तेथे शाळा कुलूपबंद असणे किंवा एक शिक्षक येऊन बाकी शिक्षक उशिरा येत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर बाब केंद्रस्तरावरील अधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यात आली होती.शुक्रवारी लोकमतने यावर वृत्त प्रसिद्ध करताच शिक्षणाधिकारी सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. या वृत्तामुळे आज दिवसभर शिक्षक वर्गात खळबळ उडालेली दिसून आली होती. तसेच या वृत्तामुळे आज जवळपास सर्वच शाळेत शिक्षक वर्ग वेळेत पोहोचल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका संघटनेच्या पदाधिकाºयाने दिली.अतिशय योग्य वृत्त प्रसिद्ध केल्याचे सांगत याचे परिणाम उद्यापासून तुम्हाला दिसायला सुरू होतील, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी दिली. विहित वेळेत रजिस्टरवर हजेरी होते की नाही, हे समजण्यासाठी आॅनलाईन प्रणालीचा उपयोग करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लेट लतीफ’ शिक्षकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:50 PM